मुलींची छेड काढल्याने उडाला गोंधळ

0

जळगाव- ला.ना. विद्यालयाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या तीन ते चार तरूणांनी बेंडाळे महाविद्यालयातील मुलींची छेड काढल्यावरून शुक्रवारी सकाळी 9 वाजता चांगलाच गोंधळ उडाला. ला.ना.शाळेतीच विद्यार्थी असल्याचा संशयावरून त्या मुलींनी मुख्याध्यापकांची भेट घेवून मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखविले. परंतू, यानंतर फोटोतील तरूण हे शाळेतील नसल्याने समोर आले. दिवसेंदिवस मुलींच्या छेड काढण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होतांना दिसत असून निर्भया पथकाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

ला. ना. विद्यालयाच्या समोरील गेटजवळ सकाळी 9 वाजेच्या सुमारास तीन ते चार तरूण उभे होते. विद्यालयाच्या समोर बेंडाळे मुलींचे महाविद्यालय असल्याने तेथील काही मुलींचे हे तरूण छेड काढीत होते. छेड काढणार्‍या तरूणांचा महाविद्यालयातील मुलींनी मोबाईलमध्ये फोटो काढला व त्यांचा पाठलाग केला. परंतू त्या मुली आपल्याकडे येत असल्याने तरूणांनी घाबरून ला.ना. शाळेत पळ काढला. शाळेतीलच विद्यार्थी असल्याचा संशय घेत मुलींनी मुख्याध्यापकांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये काढलेल्या तरूणांचे फोटो दाखवले. परंतू तरूण हे 20 ते 22 वर्षातील असल्याने ते तरूण शाळेतील नसल्याचे मुख्याध्यापकांनी समजवून सांगितले. परंतू तरूण हे शाळेतच पळून आल्याचे मुलींनी सांगितले. मुख्याध्यापकांनी त्या मुलींची समजूत घातल्यानंतर त्यांनी शाळेतून काढता पाय घेतला. परंतू या प्रकारामुळे सकाळी काहीवेळ गोंधळ उडाला होता. दरम्यान, या परिसरात नेहमीच तरूणांकडून मुलींची छेड काढण्याचा प्रकार घडत असतो. मात्र, काही मुली बदनामीच्या भितीपोठी त्या तरूणांविरूध्द तक्रार करीत नाहीत. त्यामुळे महिलांसाठी असलेल्या निर्भया पथकाने या परिसरात जास्त गस्ती वाढवून छेड काढणार्‍यांवर नजर ठेवून कारवाई करावी अशी मागणी आता महाविद्यालयीन मुलींकडून होत आहे.