मुलायम-अखिलेश यांच्यातील संघर्ष ‘राजकीय स्टंट’

0

लखनौ । उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण तापले असतांना आता अमरसिंह यांनी समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहावर भाष्य करत अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्या दोघात झालेला वाद हा ठरवून करण्यात आला होता. ते केवळ एक राजकीय स्टंट होता असा गौप्यस्फोट केला आहे. अखिलेश यादव यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी दोन्ही पिता-पुत्रांनी वादाचे नाटक केल्याचे अमरसिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मुद्दाम ‘वातावरण निर्मिती’ !
अमरसिंह म्हणाले की, समाजवादी पक्षातील संघर्षाचे वातावरण हे मुद्दाम तयार करण्यात आले होते. सायकल चिन्ह हे अखिलेश जवळ जावे असे मुलायम यांना वाटत होते. कोणत्याही वडिलाला आपल्या मुलाकडून हरावे वाटते. तसेच मुलायम सिंह यांचे झाले आहे असे ते म्हणाले. दोघांमधील भांडणे नियोजनबद्ध पद्धतीची होती असे अमरसिंह यांनी म्हटले. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे काका-पुतण्यातील वादात मुलायम यांनी मुलाची बाजू घेतल्याचे दिसून आले आहे असे अमरसिंह म्हणाले.

मुलायम यांनी बदलला निर्णय
अमरसिंह म्हणाले की, अखिलेश यादव यांनी आपल्याला पाठिंबा असणार्‍या आमदारांचे यादी निवडणूक आयोगाकडे सोपवली, तसेच त्यांना पाठिंबा असणार्‍या नेत्यांची, पदाधिकार्‍यांची यादी त्यांनी दिली. त्या यादीच्या आधारे अखिलेश यादव यांचा गट म्हणजे समाजवादी पक्ष आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले. मुलायम सिंह यादव यांनी कुठलीही यादी निवडणूक आयोगाकडे दिली नव्हती. जेव्हा सायकल चिन्ह अखिलेश यांना मिळाले त्यानंतर त्यांनी मुलायम सिंह यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजवादीने काँग्रेसने आघाडी केली त्यामुळे आपण समाजवादीच्या प्रचाराला जाणार नाही असे मुलायम सिंह यांनी म्हटले होते परंतु आता ते प्रचार करत आहे.