मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी

0

चोपडा । सालादाप्रमाणे यावर्षीही फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमीत्त चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात नेहरू युवा केंद्र जळगांव व स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पाच कन्यारत्न मातांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सर्पमित्र सागर बडगुजर, फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी, लोकनिष्ठा विकास संस्थेचे चेअरमन महेश पाटील, लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. स्त्री शिक्षणाची ज्योती प्रज्वलीत करणार्‍या भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पाच कन्यारत्न मातांचा साडी-चोळी, गुलाबपुष्प देवून गौरव करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यात मुलींचा दर हजारी प्रमाण 839 असून अशा उपक्रमांमुळे मुलींचा जन्मदर वाढेल. भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च 1943 पासुन महिला दिवस साजरा करण्यात येतो. स्त्रीभृण हत्या थांबवा, मुला- मुलींमध्ये भेद करू नका असा संदेश सांगण्यात आला. लोकसहभागातून गरीब मुला-मुलींना मदतीसाठी फाऊंडेशन नेहमी अग्रेसर असते. फाऊंडेशनमार्फत महिला सबलीकरण, बेटी बचाओ-बेटी पढाओ या विषयावर चर्चासत्रे, व्याख्याने असे अनेक विविध उपक्रम आयोजित करीत असते. नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम व सुनिल पंजे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक दिपक सैंदाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण बागुल, दिपक बनसोडे, भिकन मिस्तरी, चेतन देशमुख, कैलास निकम, बबलु वडे यांनी परिश्रम घेतले.