मुदतवाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांना घेता येणार विमा योजनेचा लाभ

0

भुसावळ : शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना मोठी झळ सहन करावी लागत असते. त्यामुळे शासनाने या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना सुरु केली असून या योजनेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, नोटबंदीमुळे काही शेतकर्‍यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले. यामुळे आता रब्बी पीकविम्याला 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कर्जदार शेतकर्‍यांना पीकविमा बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकर्‍यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जात असून बिगर कर्जदार शेतकर्‍यांना विहित अर्जासह विमा हप्ता बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये भरावा लागणार आहे. रब्बी हंगामासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीस कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांचा याचा फायदा होणार आहे. तरी यासंदर्भात अधिक माहितीसाठी या यंत्रणेचा एक टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्यावर संपर्क साधून तसेच कृषी कार्यालयात जावून शेतकर्‍यांना योजनेविषयी अधिकची माहितीदेखील घेता येणार आहे.