मुख्यमंत्र्यांनी घेतला 10 मंत्र्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा

0
मुंबई : पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या मंत्रिमंडळाच्या कामगिरीचा आढावा घेण्याच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी १० मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या कामाचा आढावा घेतला होता.
शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सर्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रमे) एकनाथ शिंदे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कामकाजाचा तपशील सादरीकरणाच्या माध्यमातून पाहिले.
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांच्या निर्देशानंतर भाजपाशासित राज्यातील प्रत्येक मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवित आहे. याच प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांनी २४ सप्टेंबरला काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या आढाव्यात  मंत्र्यांना त्यांनी घेतलेल्या प्रमुख व सर्वसामान्य जनतेवर प्रभाव टाकणाऱ्या निर्णयांची माहिती घेतली. मंत्री आणि राज्यमंत्री तसेच संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयांचे सादरीकरण पाहिले.