मुख्यमंत्र्यांची धरमपेठ झाली अधरमपेठ!

0

नागपूर : मुख्यमंत्र्यांचे गाव असलेल्या नागपूरात प्रचंड क्राईम रेट वाढला असून यावर नियंत्रण आणण्यास मुख्यमंत्री आणि पोलीस अपयशी ठरत आहेत असा आरोप धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केला. मुंडे यांनी राज्यात वाढत्या गुन्ह्याच्या प्रमाणावर बोलत असताना वाढत्या गुन्ह्याचा पाढाच वाचला. यावेळी त्यांनी जानकर यांच्यासह पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त विधानांचा देखील समाचार घेतला. विधानपरिषदेत 259 अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना ते बोलत होते.

पोलीस हतबल:मुंडे

खरंच या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे का? असा सवाल करताना त्यांनी पुरोगामी महाराष्ट्रात गुन्हेगारीवर अंकुश आणून पोषक वातावरणनिर्मिती करा अशी विनंती केली. मुंडे म्हणाले की, उपराजधानी नागपूर आणि विदर्भासहित संपूर्ण राज्यता कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला, मुली व आदिवासी मुलींवर बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे महिला आणि विद्यार्थिनींमध्ये दहशत पसरली आहे. याचा तपास होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासन देखील हतबल असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांवरील हल्ले चिंताजनक

राज्यात पोलीस कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले ही फार चिंताजनक गोष्ट असून यावर प्रभावी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. छोट्या कारणांवरून गुंड प्रवृत्तीचे लोकं पोलिसांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. जनतेची सुरक्षा करणारे पोलिसच जर सुरक्षित नसतील तर जनतेच्या सुरक्षेची ग्यारंटी काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यामुळे जनतेच्या मनात अधिक भीती पसरली असल्याचेही भाई जगताप यांनी विधानपरिषदेत सांगितले. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आज भयंकर पद्धतीने वाढत असल्याचे सांगत जगताप यांनी सरकारच्या ’महावॅलेट’ आणि कॅशलेस योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली. केवळ एक किलो संत्री खरेदी करून कॅशलेसचा उदोउदो करण्याइतके हे काम सोपे नसल्याची टीका जगताप यांनी केली. सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी देखील भाई जगताप यांनी केली. नागपूर शहर हे देहव्यापाराची राजधानी बनत असल्याचा रिपोर्ट गुन्हे अन्वेषण विभागाने दिला आहे. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असताना मुख्यमंत्र्यांच्याच नागपूरात अशी स्थिती चिंताजनक असल्याचे जगताप यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न:- विद्या चव्हाण

महिला आणि लहान मुलं ही गुन्हेगारांची सॉफ्ट टार्गेट आहेत. आज महाराष्ट्राने गुन्ह्याच्या बाबतीत बिहार आणि युपीला मागे टाकले आहे. यामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न फार चिंताजनक असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले. सोशल मीडिया आणि वाहिन्यांनी लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहेत, त्यामुळे लहान मुले गुन्हेगार बनण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर सरकार कशा प्रकारे उपाययोजना करत आहे? असा सवाल चव्हाण यांनी केला.