मुख्यमंत्र्यांचा वकिली लहजा आणि सेनेचा यु टर्न!

0

देशभरातील महत्वाच्या आणि लक्ष लागून असलेल्या निवडणुकांचा भाजपाच्या पारड्यात पडलेल्या निकालाने आत्मविश्वासयुक्त सरकार सध्या पाहायला मिळतेय. कर्जमाफीवरून गोंधळ सुरु असताना देखील सरकारची बॉडी लँग्वेज जबरदस्त आहे. त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांचा लहजा अफाटच. सरकार ठासून आत्मविश्वास, पारदर्शकता असल्याचे सांगत जरी असले तरी सध्या शेतकरी कर्जमाफी या संवेदनशील विषयाने सरकार कोंडीत सापडले आहे. पहिला आठवडा वाया गेल्यानंतर देशातील महत्वाचे निकाल आणि 4 दिवसांचा मोठा विश्राम घेतल्यांनंतर पुन्हा बुधवारी कामकाज चालले नाही. खुद्द सरकारचा भाग असलेल्या मित्रपक्ष शिवसेनाही कामकाज चालविण्यात स्वारस्य न दाखवता पुरजोर विरोधात सहभागी होती. विरोधकांनी सध्यातरी सरकारला कोंडीत पकडण्यात नियमितता ठेवत गुरुवारीही कामकाज होऊ दिले नाही. आता ‘एका ओळीत ठराव मांडा आणि विषय संपवा’ अशा भूमिकेत विरोधी पक्षाने आपले तेवर कायम ठेवले आहेत. अशीच भूमिका आजपर्यंत शिवसेनेची होती. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या विशिष्ट हातवाऱ्यांच्या शैलीच्या लहेजात निवेदन केले आणि शेतकऱ्यांचा पुळका असलेल्या सेनेने यु टर्न घेतला.

सेनेच्या या भूमिकेमुळे खरोखर आश्चर्य व्यक्त करावे ही सरकार स्थापनेपासूनची सेनेचे ही सवयच आहे म्हणून चर्चा सोडून द्यावी असं तमाम शेतकऱ्यांना वाटत असेल. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही गोंधळानेच झाल्याने काल कामकाज झाले नव्हे. विरोधी पक्षाने तोच फ्लो कायम ठेवला. सरकार कर्जमाफीच्या मुद्दयावर सकारात्मक आहे, असे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. मात्र निर्णय घेण्यात सरकारला नेमक्या काय अडचणी येताहेत? हे समजून घ्यायला देखील विरोधी पक्ष तयार नाही. शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून खलबते होत आहेत. गुप्त बैठका वाढल्या आहेत. सरकार हतलबतेच्या दिशेने वाटचाल करत असताना आज अखेर वकिली माईंड असलेले मुख्यमंत्री सभागृहात आले.

सभागृहात मुख्यमंत्री येण्याआधी आक्रमक असलेली सेना मुख्यमंत्र्यांचे निवेदन ऐकल्यानंतर शांत झालेली दिसून आली. निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला उद्देशून, ‘शेतकरी कर्जमाफी मागण्याचा अधिकार विरोधकांना नसून केवळ भाजप आणि शिवसेनेला आहे’ असे सांगत गुगली टाकली आणि सेनेची पुन्हा दांडी उडाली. यावेळी भूमिका मांडताना देखील शिवसेना सदस्य गोंधळले असल्याचे चित्र होते. शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम असून अर्थसंकल्प सादर करण्याआधी ठोस निर्णय घ्यावा असे सेनेच्या वतीने सांगण्यात आले. आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन देखील केले. सेनेच्या या यु टर्न मुळे अजून त्यांच्या भूमिकेवर संधिग्धता निर्माण झाली आहे.

सध्या अधिवेशनात आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकाच मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याशिवाय आता सरकारसमोर पर्याय नाही असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे तर विरोधी पक्ष उद्दिष्टाच्या जवळ असल्याचे फील करत आहे. शेतकरी कर्जमाफीपेक्षा सध्या तरी मोठा मुद्दा नाही. आता आम्हाला आश्वासन नको. सरकारच्या आश्वासनावर विश्वास राहिला नसल्याचे अगदी जनतेच्या मनातली भूमिका विरोधी पक्ष ठामपणे मांडत असल्याने मुख्यमंत्र्यांनी निवेदन मांडून लगेच विधानभवनातून काढता पाय घेत आहेत. मात्र जाण्यापूर्वी त्यांनी सेनेला यु टर्न घ्यायला भाग पाडले हे निश्चित!

– निलेश झालटे
9822721292