Private Advt

मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री, महापौर सेनेचेच तरीही जळगावची ‘सेना’ खडसेंच्या दारी!

शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

 

जळगाव : जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपाला विशेषत: माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या बुरुजाला सुरुंग लावून सत्ता खेचून आणली. आज महापालिकेत महापौर सेनेचेच आहेत. पालकमंत्री पदाची धुरा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हाती आहे. असे असतांना जळगाव महापालिकेतील प्रश्न घेवून महापौर व विरोधीपक्ष नेत्यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेवून चर्चा केली. राज्याचे प्रमुख उध्दव ठाकरे हे शिवसेनेचेही प्रमुख आहेत. तसेच नगरविकास खात्याचे मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे असतांना दुसर्‍या ‘एकनाथां’सोबतच्या या चर्चेने जळगावच्या सेनेचा स्वपक्षाच्या नेत्यांवर विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातील सर्वात मोठी गंमत म्हणजे जळगाव महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही!

गत महापालिका निवडणुकीत गिरीष महाजन यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे व महापालिकेतील ‘अर्थ’कारण ठराविक लोकांभोवती फिरत राहिल्याने भाजपाच्या नगरसेवकांमधील नाराजीचा स्पोट होवून ३० नगरसेवक शिवसेनेच्या तंबूत दाखल झाले. या सत्तांतरणामुळे गिरीश महाजन व शहराचे भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांना धक्का बसला असला तरी अल्पावधीतच शिवसेनेतही नाराजीनाट्य सुरु झाले आहे. याचाच नवा अध्याय बुधवारी पहायला मिळाला. एकनाथराव खडसे हे जिल्ह्यातील मोठे नेते आहे, यात कुणाचेही दुमत नाही, जिल्ह्यातील राजकीय पदाधिकार्‍यांनी त्यांच्याशी चर्चा किंवा मार्गदर्शन घेण्यातही काही वावगे नाही. मात्र महापौरांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेची दिशा नेमकी कोणती होती? कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी त्यात खडसेंचे वजन किती? हा वेगळा विषय आहे. मुख्य मुद्दा असा आहे की, जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा गुलाबराव पाटलांकडे आहे. त्यांचे सरकारमध्ये मोठे वजन आहे. हे वजन वापरुन त्यांनी महापालिकेला ६१ कोटी रुपयांचा निधीही मिळवून दिला. महापालिकेचा विषय नगरविकास खात्यांतर्गत येतो तेथेही शिवसेनेचे मंत्री आहेत. मित्रपक्ष म्हणून या भेटीकडे पाहिले तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी मदत करेल, यावर विश्वास ठेवणे थोडेसे कठीण आहे. खडसे व महाजनांमधील राजकीय वैर सर्वांना माहित आहे. यामुळे महाजनांना अडचणीत आणण्यासाठी खडसे सेनेला मदत करत असतील, हा युक्तीवाद एकवेळा पटू शकतो. यामुळेच कदाचित त्यांनी हुडको कर्जाच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले असावे. मात्र या भेटीमुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. महापौरांचे पती तथा मनपाचे विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन हे माजी आमदार सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. खडसे-जैन यांच्यातील राजकीय वैर राज्यभराला परिचित आहे. असे असतांना महाजन दांम्पत्यांनी खडसेंची घेतलेली भेट दादा समर्थकांना दुखवणारी ठरु शकते. आधीच शिवसेनेचे ज्येष्ठनेते आमदार चिमणराव पाटील व गुलाबराव पाटलांमधील कुरघोडीचे राजकारण पक्षश्रेष्ठींची डोकदूखी ठरत आहे. त्यात आता महापलिकेतील हे राजकारण कोणत्या दिशेने जाते? हे पाहणे महत्वाचे ठरेल.