मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी धुडकावले पाकिस्तानचे निमंत्रण

0

मंत्री सिद्धू यांनी निमंत्रण स्विकारत परराष्ट्र खात्याकडे केला अर्ज

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी ( दि. २८ नोव्हेंबर ) पाकिस्तानने पाठवलेले निमंत्रण धुडकावून लावले आहे. तर मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी हे निमंत्रण स्विकारत त्यासाठी त्यांनी परराष्ट्र खात्याकडे परवानगीसाठी अर्जही केला आहे. पाकिस्तानकडून भारतातील अनेक वरिष्ठ नेत्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानचे हे निमंत्रण आपले पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे कारण देत नाकारले आहे. दरम्यान, सिद्धू यांनी पाकिस्तानच्या या निमंत्रणावर पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना निमंत्रण स्विकारल्याचे उत्तर पाठवले आहे. त्यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात सिद्धू यांनी म्हटले आहे की, करतारपूर कॉरिडॉरच्या शिलान्यासाच्या या ऐतिहासिक क्षणाच्यावेळी मला आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्जही सादर केला आहे.

याअगोदरही सिद्धू हे पाकिस्तान दौऱ्यावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती. या गळाभेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

Copy