Private Advt

मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पाला अभयारण्याचा दर्जा

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय

भुसावळ : राज्य शासनाने सोमवारी मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्राला अभयारण्य निर्मितीची घोषणा केली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीनंतर एकत्रीतपणे यावल आणि मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्याची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.

राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह तीन अभयारण्य घोषित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

18 व्या बैठकीत विविध निर्णय
वन क्षेत्रातील गावकर्‍यांचे पुनवर्सन आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 18 वी बैठक आज वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीस यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर,वाय एल पी राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पश्चिम मुंबई) क्लेमेंट बेन , संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन तसेच वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.