मुक्ताई कृषी महोत्सवात पशुधन स्पर्धेत शेतकर्‍यांचा प्रतिसाद

0

मुक्ताईनगर । अ‍ॅग्रो खान्देश जळगाव व संवेदना फौंडेशन मुक्ताईनगर आयोजित व जैन इरिगेशन सि.ली. प्रायोजित मुक्ताई कृषी महोत्सव, मुक्ताई नगर जिल्हा जळगाव येथे मुक्ताई यात्रेचे निमित्त साधत 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आज शेवटचा दिवस होता. गेल्या चार दिवसात हजारो शेतकरी बांधव, वारकरी बांधव यांनी मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या. प्रदर्शनाला महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात काम करणार्‍या सुमारे शंभर कंपन्यांनी आपली उत्पादने प्रदर्शनात ठेवली होती.मुक्ताई नगर मधे पहिल्यांदाच कृषी प्रदर्शन होत असल्या मुळे परिसरात मोठा उत्साह दिसून आला. प्रदर्शनात शेतकरी बांधव यांच्या पशुधनाची स्पर्धा ठेवण्यात आली. गायी, म्हशी, बैलजोडी, शेळी, मेंढी, कुक्कुट प्राणी असे पशुधन सजून आले होते.

आमदार एकनाथराव खडसेंनी केली नियमित पाहणी
तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांनी पशुधना चे निरीक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे पारितोषिक देण्यात आले. अत्याधुनिक कृषी अवजारे, खते, पॉली हाउस, टिशू कल्चर, बचत गट, शेती उत्पादने, ट्रॅक्टर, टिलर, कार, मोटरसायकल अशा उत्पादनामुळे 12 हजार फुटाचा मोठा डोम खचा खच भरला होता. प्रदर्शनाला आमदार एकनाथराव खडसे, मंदा खडसे यांनी दररोज भेटी दिल्या. खासदार रक्षा खडसे यांनी सुद्धा प्रदर्शनाला भेट दिली व माहिती जाणून घेतली. यावेळी भाजपाचे रमेश ढोले, अशोक कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, माजी सभापती राजू माळी, विलास धायडे, सरचिटणीस सतिश चौधरी, योगेश कोलते, नारायण चौधरी, प्रल्हाद जंगले आदींनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

यांनी दिल्या भेटी
आमदार संजय सावकारे, माहिती आयूक्त व्ही.डी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. संवेदना फाऊंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी प्रदर्शन यशस्वी करून दाखवले. अ‍ॅग्रो खान्देशचे अध्यक्ष प्रमोद बर्‍हाटे, विजय वाणी, जमील देशपांडे यांनी चार दिवस नियोजन केले. मार्केटिंग हेड हेमंत भोकरडोळे, मॅनेजमेंट हेड संजीवनी यांनी व्यवस्था सांभाळली.