मुक्ताईनगर माजी सभापती हत्या प्रकरण : दोघे आरोपी जाळ्यात

0

अन्य अटकेतील तिघा आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती तथा कुर्‍हाकाकोडा येथील रहिवासी डी.ओ.पाटील यांच्या हत्येप्रकरणी नाडगाव, ता.बोदवड येथील निलेश गुरचळ (25) व अमोल लवंगे (26) या आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरचळ या आरोपीची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यातील अटकेतील तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

राजकीय वैमनस्यातून झाली होती हत्या
कुर्‍हाकाकोडा गावात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ डी.ओ.पाटील हे झोपेत असतानाच एका आरोपीने त्यांची गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. आरोपी सीसीटीव्हीदेखील कैद झाला होता. जळगाव गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलिसांना संयुक्तरीत्या या गुन्ह्याचा शनिवारी सायंकाळी उलगडा करीत कुर्‍हाकाकोडा ग्रामपंचायतीचे सदस्य तेजराव भास्कर पाटील (47, कुर्‍हाकाकोडा), शेतकरी विलास रामकृष्ण महाजन (52, कुर्‍हाकाकोडा) व चिकन विक्रेता सैय्यद शकीर सैय्यद शफी (25, कुर्‍हाकाकोडा) यांना अटक केली होती. संशयीत आरोपींच्या जवळच्या व्यक्तीविरुद्ध दाखल झालेला अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा हा मयतामुळे दाखल झाल्याचा संशय आरोपींच्या मनात असल्याने त्यांनी गावातील सैय्यद शकीर यांना सुपारी दिली होती तर आरोपी सैय्यद शकीरने नाडगावच्या दोघांना अडीच लाखांची सुपारी देवून ही हत्या घडवून आणली होती.

Copy