मुक्ताईनगर माजी सभापतींची सुपारी देवून हत्या : तिघा आरोपींना अटक

0

मुक्ताईनगर पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी : अटकेतील आरोपींमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याचा समावेश

भुसावळ (गणेश वाघ) : मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती तथा कुर्‍हाकाकोडा येथील रहिवासी डी.ओ.पाटील यांची गावातील पेट्रोल पंपाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत एका अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. या हत्येचा उलगडा करण्यास मुक्ताईनगर पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला संयुक्तरीत्या यश आले आहे. तीन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुपारी देवून ही हत्या घडवून आणण्यात आली असून आता सुपारी किलरचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

संयुक्त कारवाईत आरोपींना अटक
कुर्‍हाकाकोडा गावात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ डी.ओ.पाटील हे झोपेत असतानाच एका आरोपीने त्यांची गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती तर आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. जळगाव गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलिसांना संयुक्तरीत्या या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले आहे.

या आरोपींना झाली अटक
खून प्रकरणी कुर्‍हाकाकोडा ग्रामपंचायतीचे सदस्य तेजराव भास्कर पाटील (47, कुर्‍हाकाकोडा), विलास रामकृष्ण महाजन (52, कुर्‍हाकाकोडा) व सैय्यद शकीर सैय्यद शफी (25, कुर्‍हाकाकोडा) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संशयीत आरोपींच्या जवळच्या व्यक्तीविरुद्ध दाखल झालेला अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा हा मयतामुळे दाखल झाल्याचा संशय आरोपींच्या मनात असल्याने त्यांनी गावातील सैय्यद शकीर यांना सुपारी दिली होती तर आरोपी सैय्यद शकीरने अन्य सुपारी किलरच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून किलर कुठले आहेत वा किती रुपयांची सुपारी देण्यात आली? याबाबत आरोपींच्या चौकशीत अन्य बाबी स्पष्ट होतील, असे निरीक्षक शिंदे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्रभारी पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक कैलास भारसके, पोलिस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम, सहाय्यक निरीक्षक नाईक, उपनिरीक्षक लहारे, उपनिरीक्षक अंगद नेमाणे आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Copy