मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी अखेर अपात्र

जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय : गिरीष चौधरी यांच्या लढ्याला यश

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुक्ताईनगर नगराध्यक्षा यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवार, 8 नोव्हेंबर रोजी अपात्र घोषित केल्याने मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नागरीक गिरीश चौधरी यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती.

विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा फटका
विहित मुदतीत तडवी यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्याने मुक्ताईनगरातील गिरीश चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र नगरपरीषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 51-1ब अन्वये आव्हान दिले होते. निवडणुकीचे नाम निर्देशन पत्र भरतांना सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले मात्र नंतर या नियमात शासनाने यात सुधारणा करून सहा महिन्याच्या मुदतीत बदल करून बारा महिन्यांची मुदत केली. नगराध्यक्षा या 20 जुलै 2018 रोजी निवडून आल्याने त्यांनी 20 जुलै 2019 पर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अभिप्रेत होते मात्र सदर प्रमाणपत्र 15 ऑक्टोबर 2019 रोजी सादर करण्यात आले. याचा अर्थ प्रमाणपत्र मुदतीत सादर करण्यात आले नाही, असा दावा महाजन यांच्यातर्फे याचिकेत करण्यात आला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहा.आयुक्त जनार्दन पवार यांनी नजमा तडवी यांना सोमवार, 8 रोजी अपात्र ठरवले आहे. गिरीश चौधरी यांच्यातर्फे औरंगाबाद उच्च न्यायालयातील अ‍ॅड.भाऊसाहेब देशमुख यांनी काम पाहिले.

भ्रष्टाचार बाहेर काढणार : गिरीष चौधरी
या प्रकरणातील याचिकाकर्ते गिरीष चौधरी म्हणाले की, यापुढील काळात नगरपंचायतीच्या घनकचरा व इतर निविदा प्रक्रियेसह माझी वसुंधरा कार्यक्रमातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.

न्याय प्रक्रियेवर विश्‍वास : नजमा तडवी
जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. न्याय प्रक्रियेवर आमचा विश्‍वास असून या निकालाविरोधात आम्ही अपिलात जावू, असे नजमा तडवी यांनी सांगितले.

Copy