Private Advt

मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी पहिल्या दोन तासात 10 टक्के मतदान

0

तिघा नगराध्यक्षांनी बजावला हक्क ः नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रथमच होत असलेल्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. साडेसात ते साडेनऊ दरम्यान पहिल्या दोन तासात अवघे दहा टक्के मतदान झाले तर दुपारनंतर तसेच सायंकाळनंतर मतदारांची केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तिरंगी तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा हा मतदार संघ असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिवसेना- राष्ट्रवादी अशी आघाडी आहे. एकूण 23 हजार 726 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी (महिला) राखीव आहे.

तिघा इच्छूक उमेदवारांनी बजावला हक्क
नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार नजमा इरफान तडवी यांनी खडसे महाविद्यालयात तर शिवसेनेच्या ज्योस्त्ना दिलीप तायडे यांनी संत मुक्ताई कला, वाणिज्य महाविद्यालयात तर काँग्रेसच्या माधुरी आत्माराम जाधव यांंनी मुलांच्या उर्दू शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

पक्ष चिन्हावर निवडणूक
भाजपाने सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागांवर उमेदवार दिले आहेत तर शिवसेनेच्यावतीने 13, काँग्रेस सात तर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त तीन जागा लढवित आहे. पक्षाच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढविली जात आहे. 17 जागांसाठी पक्षनिहाय उमेदवार असे- भाजप- 17, शिवसेना-13, राष्ट्रवादी काँग्रेस- 3, काँग्रेस- 7, भारिप बहुजन महासंघ-4 तर अपक्ष-29 नशीब आजमावत आहेत.