मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाला रीक्त पदांअभावी कुलूप ठोकण्याचा इशारा

0

समन्वय समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील यांचा अल्टीमेटम ; आरोग्य विभागाच्या बेफिकिरीने संताप

मुक्ताईनगर- उपजिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्यामुळे तसेच भरण्यात आलेल्या पदांवरील वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने रुग्णांना जळगाव येथे हलविण्यात येत आहे यामुळे मात्र उपजिल्हा रुग्णालय फक्त शोपीस बनून राहिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांना उपचाराविना परतावे लागत आहे. दोन-तीन दिवसात वैद्यकीय अधिकारी हजर न झाल्यास रुग्णालयास टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा समन्वय समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील यांनी दिला आहे.

एकाच वैद्यकीय अधिकार्‍यांवर मदार
तालुक्यातील 81 गावांसाठी तसेच आजूबाजूच्या असलेल्या गावांसाठी रुग्णांसाठी मुक्ताईनगर येथे उपजिल्हा रुग्णालय माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले आहे परंतु या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून वैद्यकीय अधिकार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. काही वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणासाठी बाहेर गेली असताना सुद्धा त्यांचे सुद्धा नावे मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आहे त्यामुळे आज रोजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय केवळ एकच वैद्यकीय अधिकारी नम्रता अच्छा या कार्यरत आहेत. केवळ एकमेव वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांना जळगाव येथे सुद्धा मीटिंगसाठी जावे लागते त्या इतरत्र मीटिंगसाठी गेल्यानंतर उपचार करणारे कोणतेच वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेक रुग्णांना योग्य उपचार योग्य वेळी उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे अनेक रुग्णांचे बळी जातात. मुक्ताईनगर शहरास लागून राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्ग असल्याने याठिकाणी मोठ-मोठे अपघात होत असतात इतकेच नव्हे तर तालुक्यातील अनेक रुग्ण महिला-पुरुष, बालके वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त उपजिल्हा रुग्णालयात येत असतात परंतु एकमेव वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावरच जास्त ताण पडतो त्यामुळे रिक्त असलेल्या पदांवर त्वरित वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी नियुक्त करावे, अशी मागणी वारंवार होत आहे.

उपचाराअभावी अनेकांना गमवावा लागला जीव
गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथे येणार्‍या रुग्णांना जळगाव येथे हलवण्यात येत असल्याने
गोर-गरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बर्‍याचदा जळगाव येथे जाण्यासाठी दोन तास लागत असल्याने या कालावधीत गंभीर जखमी तसेच अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागतो. मुक्ताईनगर तालुक्यातील बोटा येथील रुग्ण शेतात फवारणी करत असताना त्याला विषबाधा झाल्याने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात आला असता येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्या रुग्णास तात्काळ जळगाव येथे हलविण्यात आले. याप्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, पोलिस पाटील दीपक चौधरी यांनी उपजिल्हा रुग्णालयात यासंदर्भात विचारणा केली असता येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने तसेच आवश्यक यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना येथे ठेवता येणार नाही, असे उत्तर देण्यात आले. अत्यवस्थ नसलेल्या रुग्णांना सुद्धा जळगाव येथे हलविण्यात येत असल्याने त्यांच्यावर येथेच उपचार करण्याची मागणी निवृत्ती पाटील यांनी केली. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पाटील यांनी ही बाब लक्षात आणून दिली असता ही बाब अतिशय गंभीर असून याकडे शासनाचे लक्ष वेधून उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ वैद्यकीय अधिकारी व आवश्यकतेप्रमाणे कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार खडसे म्हणाले.

Copy