Private Advt

मुक्ताईनगरात तणाव निवळला : चौघांना अटक

ट्रकमधील 40 गुरांची पोलिसांची सुटका करीत केली गो शाळेत रवानगी : मध्यरात्रीच केले चबुतर्‍याचे बांधकाम

मुक्ताईनगर : शहरातील प्रवर्तन चौकातील महापुरूषांच्या पुतळा असलेल्या परीसरातील चबुतर्‍याला गुरांची वाहतूक करणार्‍या ट्रकने धडक दिल्यानंतर रविवारी रात्री शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांनी संयमांनी परीस्थिती हाताळत मध्यरात्रीच तसेच सोमवारी सकाळी चबुतर्‍याचे काम पूर्ण केले तर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ट्रकमधील 40 गुरांची सुटका करीत त्यांची गो शाळेत रवानगी करण्यात आली आहे.

चबुतर्‍याला धडकेमुळे शहरात तणाव
मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरकडून मुक्ताईनगरकडे निघालेला ट्रक (एम.पी.09 एच.जी.9666) मधून कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक केली जात होती व या ट्रकने रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दरम्यान मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात असलेल्या महापुरूषांच्या चबुतर्‍याला धडक दिल्याने मोठे नुकसान झाले होते. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. सुदैवाने या अपघातात दुचाकीवरून जाणारे लहान मुलीसह तिचे वडील बचावले होते. अपघातानंतर ट्रक चालकाने आपला जीव मुठीत घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर वातावरण संतप्त झाले होते मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्यासह पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे तसेच जिल्ह्यावरून मोठ्या प्रमाणावर कुमक बोलावल्यानंतर वातावरण निवळले होते.

या पदाधिकार्‍यांनी केले शांततेचे आवाहन
शहरात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होवू नये यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक विभागाचे सचिव के.वाय.सुरवाडे, तालुकाध्यक्ष शरद बोदडे, नगरसेवक बापू ससाणे, सुधाकर बोदडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, गोपाळ सोनवणे, पंचशील टेलर, रवींद्र बोदडे, अ‍ॅड.राहुल पाटील तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काळजी घेत शांतता राखण्याचे आवाहन केले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने शहरातील महापुरुषांचे पुतळे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची तुट झाली नसल्याचे सांगत जनतेने शांततेचे आवाहन केले तसेच जनतेने शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन डीवायएसपी विवेक लावंड तसेच पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे. सोमवारी सकाळी जिल्हा परीषदेचे समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी प्रवर्तन चौकात भेट देत पाहणी केली.

यांना झाली अटक
या प्रकरणी पोलिसांनी अमजद मुस्ताक सैय्यद (रा.सारंगपूर, रायगड), सद्दाम अजमल अली (रा.सारंगपूर), परवेज नईमखान (रा.बोरासर, जि.भोपाळ), समीम शाबरखान (रा.धनोरा, जि.ब्रिदीसा, मध्यप्रदेश) या चौघांना अटक करीत त्यांच्याविरोधात विनापरवाना गुरांची वाहतूक तसेच प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करीत आहेत.