Private Advt

मुक्ताईनगरात कौटुंबिक वादातून शालकाची हत्या ; मेहुणा पसार

मुक्ताईनगर (अक्षय पालवे) : कौटुंबिक वादातून मेहुण्याने शालकाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली. या घटनेत विशाल वामन ठोसरे (24, भुसावळ रोड, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ, मुक्ताईनगर) या तरुणाचा मृत्यू झाला तर संशयीत आरोपी व नात्याने असलेला मेहुणा विजय चेताराम सावकारे (35, चुंचाळे, ता.यावल) हा पसार झाला आहे. आरोपीचा जिल्हाभरात शोध सुरू करण्यात आला आहे.

तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या शालकाची हत्या
भुसावळ रस्त्यावरील पशू वैद्यकीय दवाखान्याजवळ ठोसरे कुटुंब वास्तव्यास आहे. सेवानिवृत्त शिक्षक वामन चावदास ठोसरे यांच्या मुलीचे चुंचाळे (ता.यावल) येथील विजय सावकारे याच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद वाढले होते. त्यातच संशयीत आरोपी विजय सावकारे यांची पत्नी माहेरी मुक्ताईनगरात आल्यांनतर तीन दिवसांपूर्वी 14 रोजी आरोपीदेखील सासरवाडीत दाखल झाला होता मात्र कौटुंबिक कारणावरून गुरुवारी रात्री विजय सावकारे याने गोंधळ घातल्यानंतर तो मिटवल्यानंतर सावकारेसह तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेला शालक विशाल वामन ठोसरे (24) वरच्या खोलीत झोपण्यास गेले होते. शुक्रवारी सकाळी कुटुंबीय जावयास व मुलास उठवण्यासाठी गेले असता विशाल ठोसरे हा रक्ताच्या थारोळ्यात मयत पडला असल्याचे दिसताच कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला तर यावेळी विजय सावकारे मात्र पसार झाल्याचे दिसून आले.

झोपेत हत्या केल्याचा संशय
मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी विजय सावकारे याने विशाल ठोसरे याच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली व तो पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी मयताचे वडील वामन चावदस ठोसरे यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी विजय सावकारेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक राहुल खताळ व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांना कुर्‍हाडीचा दांडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. मयताच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परीवार आहे. मयताचा सुमारे तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाल्याचे सांगण्यात आले.