मुक्ताईनगरातील दुष्काळाचा प्रश्‍न विधानसभेत गाजला

0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही, भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसेंचा संताप
मुंबई । राज्यात दुष्काळी परिस्थिती असतांना दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा घरचा आहेर माजी महसुलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराय खडसे यांनी आज विधानसभेत दिला. मुक्ताईनगर मतदार संघात ८१ गावामध्ये पाणी मिळत नाही. याबाबत मी सभापतींना पत्र देणार आहे. मला आता पायर्‍यांवर बसण्याची परवानगी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकार्‍यांच्या वेळकाढू धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली.
यामुळे पाणीप्रश्‍न पेटण्याची शक्यता आहे.

आमदार खडसे सरकारवर नाराज असल्याने अनेकवेळा त्यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत त्यांनी पुन्हा सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असायला हवे. पण आज प्रशासनाकडे स्टाफ कमी आहे. आमच्यासारखा माणूस ३ महिने पत्रव्यवहार करत आहे. माझ्यावर पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे, माझी ही स्थिती आहे. हे सरकार दुष्काळाचा पोरखेळ तर करत नाही ना? असा सवाल त्यांनी सरकारला केला. तुमच्याकडे माणसंच नाहीत तर तुम्ही काय दुष्काळावर मात करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.पाण्याच्या समस्येबाबत मी जिल्हाधिकारी कार्यालयाला सांगितले. जळगावचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांना देखील याबाबत सांगितले, मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे जायचे कुठे? असा सवालही त्यांनी केला. ज्या ठिकाणी माझ्या मतदार संघात पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ येते तेव्हा जनावरांची काय स्थिती आहे याचा अंदाज लावा, अशा शब्दात खडसे यांनी संताप व्यक्त केला. खडसे यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे सत्ताधार्‍यांना हतबलपणे ऐकून घेण्यापुढे काही पर्याय नव्हता मात्र विरोधकांनी त्यांचे स्वागत केले.

१५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ
जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, बोदवड, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर व यावल तालुक्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळी खालवली आहे. यात रावेर, यावल, भुसावळमध्ये ३ मिटर, जळगाव तालुक्यात २ ते ३ मिटर व मुक्ताईनगर आणि जामनेर तालुक्यात १ ते २ मिटरने पाणी पातळी खालवली आहे. यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.