मुंबई बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका; भाजपचा सुपडा साफ

0

नवी मुंबई: महाविकास आघाडीचा प्रयोग मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राबविण्यात आला. तो यशस्वी झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. भाजपची सुपडा साफ झाला आहे. भाजपला एकही जागा मिळाली नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमधून यंदा सुमारे ९३ टक्के मतदान झाले होते. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी व चार व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी हे मतदान झालं. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

केंद्रासोबतच राज्यात सत्ता असताना गेल्या पाच वर्षांत सहकार क्षेत्रासोबातच छोटी-मोठी सत्तास्थाने ताब्यात घेण्याचा सपाटा भाजपने लावला होता. राज्यातील सत्ता जाताच भाजपला धक्के बसू लागले आहे. जिल्हा परिषदांनंतर महत्त्वाच्या अशा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपची धोबीपछाड झाली आहे.

कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळुंज निवडून आले आहेत. त्यांनी राजेंद्र शेळके यांचा पराभव केला. भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे यांनी के. डी. मोरे यांना पराभवाची धूळ चारली. मसाला मार्केटमधून विजय भुता यांनी कीर्ती राणा यांचा पराभव केला आहे. धान्य मार्केटमधून निलेश विरा विजयी झाले आहेत. कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केटमधून संजय पानसरे यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. अमरावती विभागातून काँग्रेसचे प्रवीण देशमुख व शिवसेनेचे माधव जाधव विजयी झाले. अन्य विभागांमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

Copy