मुंबई-पुण्यात घरे स्वस्त

0

पुणे : विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या वाढू लागल्याने विकासकांकडून घर खरेदीवर अनेक प्रकारच्या सवलतींचा वर्षाव करण्यात येतो आहे. सदनिकांची विक्री न झाल्याने विकासकांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे सदनिकांच्या विक्रीसाठी मुंबईतील विकासकांकडून 15 ते 20 टक्क्यांची सवलत देण्यात येत आहे. अनेक विकासकांनी सदनिकांच्या एकूण किमतीवर 15 ते 20 टक्क्यांची सवलत देऊ केली आहे. यासोबतच काही विकासकांकडून ‘मुंबईत घर खरेदी करा आणि अलिबागमध्ये आणखी एक घर मोफत मिळवा’, अशीदेखील योजना आणण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत सवलतीत घर खरेदी करून अलिबागमध्ये मोफत घर मिळवण्याची संधी विकासकांकडून देण्यात आली आहे.

सदनिकांवर 15 ते 20 टक्क्यांची सवलत
पुणेस्थित कोलते पाटील डेव्हलपर्सकडून बांधकाम जवळपास पूर्ण झालेल्या सदनिका लाँचिंग किमतीला विकण्यात येत आहेत. कोलते पाटील डेव्हलपर्सकडून प्रकल्पातील सदनिकांवर 15 ते 20 टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय आणि लवकरच लागू होणारा वस्तू आणि सेवा कर कायदा यांच्यामुळे अनेकांनी घर खरेदीचा विचार पुढे ढकलला आहे. त्यामुळे विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे विकासकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळेच आता सदनिकांवर सूट देऊन त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न विकासकांकडून सुरू आहे. देशभरात सध्याच्या घडीला 6.7 लाख घरे विक्रीविना पडून आहेत. यातील तब्बल 1.55 लाख घरे मुंबई आणि आसपासच्या परिसरात आहेत. त्यामुळे या घरांवर सवलत देऊन लवकरात लवकर नव्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न विकासकांकडून सुरू आहे.