मुंबई ठाण्यात शिवसेनेची आप होऊ लागलीय

0

मुंबई : मुंबई महापालिकेत हाताशी बहुमत नसतानाही एकहाती सत्ता उपभोगणार्‍या शिवसेनेला आपलेच राजकारण अडचणीत घेऊन चालले आहे. ठाण्यात सेनेने एकहाती बहुमत मिळवले होते. पण भाजपाला शह देण्याच्या नादात तेही बहुमत कुशलतेने वापरता आले नाही आणि स्थायी समितीमध्ये सेनेची कोंडी होत चालली आहे. वास्तविक ठाण्यात छोटा पक्ष असलेल्या भाजपला सोबत घेऊन सेनेला आरामात सत्ता उपभोगता आली असती. पण कायमची दुष्मनी करण्याच्या केजरीवाल नादात सेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातचे खेळणे होऊ लागले आहे.

निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पाठबळावर स्थायी समितीमध्ये सेनेचे आठ तर राष्ट्रवादी पाच व भाजपचे तीन सदस्य निवडून येऊ शकत होते. इथे कॉग्रेसच्या गटनेत्याला पंखाखाली घेऊन शिवसेनेने भाजपाला पूर्णपणे बाजूला टाकण्याचा पवित्रा घेतला आणि समस्या सुरू झाली. आता भाजपाने कॉग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेला ठाणे पालिकेत शह देण्याचे डाव चालविले आहेत. न्यायालयापासून सरकारी खात्यापर्यंत धावपळ करण्याची वेळ सेनेवर आलेली आहे.

गेल्याच आठवड्यात अशा राजकारणाचे दिल्लीत आम आदमी पक्षाला कोणते परिणाम भोगावे लागले, त्याचे निकाल समोर आलेले आहेत. पण त्यापासून काही शिकण्याची सेनेची तयारी दिसत नाही. थोडक्यात मुंबई ठाण्यात शिवसेनेची आम आदमी पार्टी होऊ घातली, असेच म्हणायची पाळी येत चालली आहे.