मुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’ उपक्रम

0
देशांतर्गत पर्यटनाला मिळणार चालना, विविध राज्यांच्या कला, संस्कृतींचे सादरी करण होणार
मुंबई: देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सध्या ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’चे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत मुंबईकरांना देशाच्या विविध भागातील पर्यटन स्थळे, संस्कृती, कला, खाद्यसंस्कृती आदींची माहिती आणि आस्वाद घेता येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात वारली चित्रकला, मेहंदी बाटीक पेंटींग, कॅनव्हासवरील चित्रकला आदींबाबत कार्यशाळा होणार असून यात सर्वांना मोफत सहभागी होता येणार आहे. भारताची विविधता, पर्यटन, कला आणि संस्कृतीची माहिती देणाऱ्या या उपक्रमास लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन भारत पर्यटनच्या पश्चिम आणि मध्य क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक नीला लाड यांनी केले आहे.
एअर इंडिया इमारतीतील भारत पर्यटनच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमती लाड यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ‘मिनी भारत पर्व’ अंतर्गतचे विविध कार्यक्रम २७ आणि २८ सप्टेंबर रोजी पु. ल. देशपांडे कलांगण, प्रभादेवी येथे होतील, असे त्यांनी सांगितले.
देशात १६ ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘पर्यटन पर्व’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात ‘देखो अपना देश’ तसेच ‘सभी के लिए पर्यटन’ या उपक्रमांमधून देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. याशिवाय २७ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. यात देशातील विविध राज्यांच्या पर्यटनाची माहिती देणारे स्टॉल असतील. तसेच विविध राज्यातील हस्तकला, हातमाग, वस्त्रोद्योग आदींची माहिती आणि विक्रीचे स्टॉल असतील. याशिवाय खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून लोकांना विविध राज्यांतील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. हे स्टॉल सकाळी ११ वाजेपासून दिवसभर सुरु असतील.
दुपारी १२ ते ४ वाजण्याच्या दरम्यान चित्रकलेचे विद्यार्थी सादरीकरण करतील. याशिवाय वारली चित्रकला, मेहंदी बाटीक पेंटींग, कॅनव्हासवरील चित्रकला आदींबाबत कलाकारांसमवेत संवाद साधत कार्यशाळा होणार आहे. यात विद्यार्थ्यासह सर्वांना मोफत सहभागी होता येईल. सायंकाळी ६ वाजेनंतर आदीवासी नृत्य, बिहू (आसाम), बैलपोळा (महाराष्ट्र), सिंघीछाम (सिक्कीम), गरबा (गुजरात), कालबेलिया (राजस्थान), लावणी (महाराष्ट्र), चेराव बांबू नृत्य (मिझोराम), करकट्टम (तामिळनाडू) आदी नृत्य-कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. ‘मेरा भारत-स्वच्छ भारत’ अंतर्गत केंद्रीय विद्यालयांमधून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील निवडक १०० चित्रांचे प्रदर्शनही कार्यक्रमस्थळी लावण्यात येणार आहे.
देशात अंतर्गत पर्यटनाला मोठा वाव आहे. लोकांना विविध राज्यांची संस्कृती, पर्यटन स्थळे, खाद्यसंस्कृती, हेरीटेज टुरीजम, क्रुझ टुरीजम, वन्यजीव पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, साहसी पर्यटन, आदीवासी क्षेत्रातील पर्यटन आदींची माहिती देण्यासाठी केंद्र शासन विविध उपक्रम राबवित असून ‘मिनी भारत पर्व’ उपक्रमांस लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन श्रीमती नीला लाड यांनी यावेळी केले.
Copy