मुंबईत ‘कम्युनिटी‘ वर्चस्वाची लढाई

0

महाराष्ट्रात ‘मिनी विधानसभा असे वर्णन केले गेलेल्या 10 महानगरपालिका, 26 जिल्हापरिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या रणधुमाळीत देशाचे व राज्याचे लक्ष केंद्रित झाले होते, ते फक्त मुंबई पालिकेच्या निवडणुकीवर. म्हणूनच या निवडणुकांचा निकाल बाहेर येताच मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या एक सुप्त राजकीय संघर्षाची दखल घेणे महाराष्ट्राच्या जनमानसाच्या हिताच्या दृष्टीने क्रमप्राप्त ठरते.

मुंबई महानगरपालिकेत 1997 पासून एकत्रित असलेली शिवसेना-भाजप युती तुटल्याने सर्वच पक्ष स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत होते. त्यामुळे सर्वच पक्षांना आपला स्वतंत्र राजकीय अजेंडा मुंबईकरांच्या समोर घेऊन जायचा होता. 1997 ते 2017 म्हणजे वीस वर्षे शिवसेनेसोबत मुंबई पालिकेच्या कारभारात सहकारी म्हणून सहभागी असतानाही आपली स्वतंत्र ओळख तयार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला आरोपाच्या पिंजर्‍यात उभे करत ‘माफीयाराज’ असे विशेषण लावले. त्याचबरोबर यापुढे मुंबई पालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शीय आणि विकासाला प्राधान्य देणारा असायला हवा जो आम्ही देऊ, असा आपला स्वतंत्र राजकीय अजेंडा भाजपने बनवला व प्रचार सुरू केला.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमान यावर भर देत पारदर्शकतेवर उपाहासात्मक भाष्य करत मुंबईचा विकास आम्हीच करू, असे प्रत्युत्तर देत भाजप सोबत राजकीय लढाई लढवली. या दोन्ही पक्षांच्या संघर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांचा प्रचार झाकोळला गेला. मुंबईच्या नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी शिवसेना-भाजप पक्षात चाललेली खेचाखेची पाहता हा सर्व खटाटोप मुंबईच्या विकासासाठी चालू आहे, असे कुणालाही वाटून मतदारांचा ऊर भरून येऊ शकतो.

पण वस्तुस्थिती नेमकी उलटी होती. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही कधीच पारदर्शकता, विकास व सोयीसुविधांच्या मुद्द्यावर लढवली जात नाही. हा फक्त शाब्दिक खेळ असतो. त्याच्या मुळात असतो तो एक सुप्त भावनिक आकांक्षाचा विचार, तो म्हणजे या मुंबई शहराची सूत्रे कोणत्या भाषिक समुदायाच्या हातात राहणारा। भूमिपुत्र म्हणून मराठी भाषिक आपले वर्चस्व गाजवणार की बहुभाषीय ‘कम्युनिटी’ आपल्या आर्थिक व संख्येच्या बळावर मुंबईला आपल्या हातात ठेवणार.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईवर आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी प्रत्येक ‘कम्युनिटी’ राजकीय व्यासपीठाच्या आधारे आपले भाषिक सांख्यिक बळाचे शक्तिप्रदर्शन करीत असते. शिवसेना हा मराठीवादी पक्ष असल्याने 1968 च्या निवडणुकीपासून हा मुद्दा ठळकपणे उपस्थित करत आली आहे. मुंबईतले बहुभाषिक वाढते रूप पाहून शिवसेनेने या निवडणुकीत हा मुद्दा विस्ताराने मांडला नाही, तरी मराठी स्वाभिमानाची भाषा केलीच।

भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्याने शिवसेनेच्या मराठी अजेंड्याला भिडताना व आपले मुंबईतील बहुभाषिक मतदार सांभाळताना स्वतःवर प्रांतवादाचा, भाषीय संघर्षाचा आरोप लागू नये म्हणून मोठ्या धूर्तपणे राजकीय डाव मांडला. शिवसेनेला आव्हान देताना माफीया, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्ती हे मुद्दे मांडत पडद्याआडून भाजपने मोठ्या हुशारीने गुजराती, उत्तरभारतीय कम्युनिटीच्या मनात, ‘मुंबईवर आपलाही हक्क आहे. या शहरावर आपले प्रभुत्व असायला हवे. ही सुप्त महत्त्वाकांक्षा जागृत केली आणि एकगठ्ठा मतदान करण्यास प्रवृत्त केले.

मुंबईतील निकाल पाहता भाजप बहुभाषिक कम्युनिटीत मुंबईवर आपलेही वर्चस्व असायला हवे, या विचारांना जागृत करून एकत्र आणण्यात यशस्वी झाली हे स्पष्ट होते. भाजपने मुंबईत जे 82 नगरसेवक निवडून आणले ते बहुभाषिक कम्युनिटीच्या एकत्रितकरणामुळेच. पारदर्शी कारभार वा विकासाला साथ म्हणून कोणीही भाजपला मतदान केलेले नाही. या निवडणुकीत मुुंबईत मराठी-अमराठी अशी राजकीय विभागणी झाली हे सत्य आहे.

महाराष्ट्राच्या अस्मिता व स्वाभिमान यांना मानणार्‍या मुंबईतल्या 30 ते 35 टक्के मराठी समुदायाच्या बहुसंख्याकांनी शिवसेनेला मतदान केले. शिवसेनेचा प्रमुख मतदार मराठीच होता. त्या मतांच्या बळावरच शिवसेना 84 जागापर्यंत पोहोचली. भाजपचे मुंबईत बळ वाढते म्हणून गुजराती (जैन) मारवाडी, गोरेगाव, घाटकोपर, अंधेरी, अशा अनेक बहुभाषिक पट्ट्यात ‘कम्युनिटी’ एकत्रिकरणाचा सांख्यिक फायदा भाजपला झाला.

भाजपने 192 उमेदवारात 56 अमराठी भाषिक उभे केले होते. त्यातील 23 गुजराती, 12 उत्तर भारती व एक दक्षिण भारतीय मिळून 36 अमराठी ‘कम्युनिटी’ चे उमेदवार नगरसेवक बनले. भाजपच्या झेंड्याखाली अमराठी कम्युनिटीचे हे एकत्रीकरण भावी काळात मुंबईचा समतोल बिघडू शकते. काँग्रेस पक्षाने मुंबईत आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेक कम्युनिटींना बळ देऊन वाढवले. त्यामुळे मुंबईत भूमिपुत्र मराठी आणि इतर भाषिकांत वेळोवेळी संघर्ष उभा राहिला. आज भाजप मुंबईत आपले राजकीय स्थान वाढवण्यासाठी तोच मार्ग अवलंबित आहे. मुंबईचा विकास भाजपने जरूर करावा, पण त्या आडून मतांच्या बेगमीसाठी बहुभाषिकांच्या कम्युनिटीच्या वर्चस्वाला बळ देऊन मुंबईच्या मराठी भाषिकाचा बळी घेऊ नये, एवढीच अपेक्षा।
विजय य. सामंत – 9819960303