मुंबईत आईसह तीन दिवसांच्या बाळाला करोनाची लागण

0

मुंबई – मुंबईतील चेंबूर परिसरात आईसह तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त सदर नर्सिंग होममध्ये काम करणार्‍या रिसेप्शनिस्टलादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे.

२९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या पत्नीची प्रसुती झाली. त्यानंतर माझ्या पत्नीला आणि तान्ह्या बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आले. परंतु दुपारी २ च्या सुमारास एका परिचारिकेने आम्हाला पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितले. २४ तासांनंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला. आम्हाला ज्या खोलीत हलवण्यात आले होती ती खोली करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर तपासण्यासाठी येणार नाही असे त्यांनी आम्हाला सांगितले, असा आरोपही महिलेच्या पतीने केला आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आपल्या पत्नीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती, असेही त्यांच्या पतीने नमूद केले. ही वर्टिकल ट्रान्समिशनची केस आहे का याबद्दल आम्हाला कल्पना नाही. हे एक वैद्यकीय कायदेशीर प्रकरण आहे. बाळाला जन्मापासूनच व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असू शकते, असे एका अन्य डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

Copy