मुंबईतील ब्रिटीशकालीन मैलाच्या दगडांना पुरातन वास्तूचा दर्जा

0

मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या शहरात ब्रिटीश काळात ठरावीक अंतरांवर ‘मैलाचे दगड’ रोवण्यात आले होते. त्या दगडांवर मुंबईच्या क्षेत्रफळाची आणि इतर महत्वाची माहिती दर्शविली आहे. मुंबईच्या विकासात ऐतिहासिक महत्व आणि संदर्भ असलेले दगड नष्ट होत आहेत. आता या दगडांचे जतन पालिका करणार असून या दगडांना पुरातन वास्तूचा दर्जा दिला जाणार आहे.

मुंबई महापालिका ही देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणली जात असून ही पालिका सुमारे दिड कोटी जनतेला मुलभूत सेवासुविधा पुरवत आहे. मुंबई शहराची ओळख आणि इतिहास सांगणार्‍या अनेक वास्तू या मुंबापुरीत आहेत. या वास्तूंचे जतन करणे पालिकेचे कर्तव्य आहे. मुंबईच्या विकासात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या दगडांचा वारसा नष्ट होत आहे. त्यामुळे या दगडांना पुरातन वास्तूचा दर्जा मिळावा अशी मागणी एका ठरावाच्या सुचनेद्वारे शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. पालिकेने त्यावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.ही ठरावाची सूचना आता लवकरच पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी येणार आहे सभागृहाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करेल. ब्रिटीश काळात अंतर मोजण्यासाठी पालिकेने रोवलेले दगड अजूनही अस्तित्वात आहेत. हे दगड काळबादेवी, लोअर परळ, दादर, भायखळा आणि माझगाव आदी भागात दिसून येत आहेत. या दगडांवर असलेली माहिती ऐतिहासिक दस्तऐवज आहे.