मुंबईच्या चाळीत राहणार्‍या मराठी तरुणाने उभारली 85 दशलक्ष डॉलर्सची कंपनी

0

डॉ. युवराज परदेशी :

खोल दे पंख मेरे, कहता है परिंदा, अभी और उडान बाकी है,
जमीं नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमान बाकी है,
लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझ ऐ नादाँ,
जितनी गहराई अन्दर है, बाहर उतना तूफान बाकी है…

अशाच मंत्राच्या जोरावर मुंबईतील एका चाळीत राहणार्‍या एका मराठमोळ्या तरुणाने संकट व अपयशांना धोबीपछाड देत तब्बल 85 दशलक्ष डॉलर्सची उलाढाल असलेली कंपनी उभारुन दाखविण्याची अचाट कामगिरी करुन दाखविली आहे. द इंडिया नेटवर्कचे संस्थापक व सीईओ राहुल नार्वेकर यांच्या आयुष्याची वाटचाल एखाद्या मसालेदार हिंदी चित्रपटाला शोभणारी आहे. जसे एखाद्या चित्रपटाचा नायक जीवनात यशस्वी झाल्यानंतर तो जेंव्हा फ्लॅशबॅकमध्ये जातो तेंव्हा त्याची सुरुवात अत्यंत गरीबीतून झालेली असते. त्याच्या दोन वेळेच्या जेवणाचेही वांधे असतात. मात्र परिस्थितीशी दोन हात करत तो यश मिळवतो…असे काहीसे चित्रण असते मात्र हुबेहुब असेच काहीसे राहुल नार्वेकरांच्या बाबतीत घडले असल्याची प्रचिती त्यांचा जीवनप्रवास उलगडतांना येते.

मुंबईतील एका छोट्याशा चाळीत राहुल यांचा जन्म झाला. राहुल यांचे वडील एक अनाथ होते. जे मुंबईतल्याच एका अनाथ आश्रमात लहानाचे मोठे झाले होते. यामुळे त्यांनी गरीबीला अत्यंत जवळून पाहिले होते. आपल्या आयुष्यात जे घडले ते आपल्या मुलासोबत घडू नये यासाठी ते एका कंपनीत छोटीशी नोकरी करत होते. कंपनीकडून मिळणार्‍या पगारातून खूप काही मिळत नसले तरी किमान आपल्या कुटुंबाचे तर भरतेय ना! अशी स्वत:ची समजूत काढत ते दिवस रात्र मेहनत करत होते. तेंव्हा लहान असलेल्या राहुलला यातले खूप काही कळत नसले तरी, आपल्या बापाची धडपड व प्रामाणिक मेहनत दिसत होती. चाळीतील सभावतालची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती, म्हणतात ना ‘घरोघरी मातीच्या चुली’ तशाच काहीशा वातावरणात राहुल लहानाचा मोठा होत होता. घरात दोनवेळा जेवणाचेही वांधे असलेल्या त्या काळात राहुल काहीसा लाजरा बुजराच होता. फारसे कुणाशी बोलणे नाही किंवा कुणात मिसळायचे नाही, शांत व अबोल दिसणार्‍या राहुलच्या मनात कोणत्या विचारांचे वादळ सुरु होते, हे त्याच्या कुटुंबियांना देखील कळत नव्हते. घरची बेताची परिस्थिती असली तरी त्यांच्या चाळीत ते सज्जन कुटुंबिय म्हणून परिचित होते. एकामागून एक दिवस जात असतांना नार्वेकर कुटुंबावर एक भलेमोठे संकट कोसळले… कंपनी बंद पडल्याने राहुलच्या वडिलांची अचानक नोकरी गेली. पुढी 10-12 वर्षांचा काळ संपूर्ण कुटूंबासाठी प्रचंड खाचखळग्यांनी भरलेला होता.

वडील मिळेल ते काम करत संसाराचा गाडा ओढत होते त्यांना हातभार लागावा यासाठी राहुलची आई देखील कपडे शिवून देत थोड पैसे कमवत होत्या. आपल्यावर जी वेळ आली आहे ती आपल्या मुलावर येवू नये यासाठी नार्वेकर दाम्पत्याने राहुलला शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला. इतरांप्रमाणे मोठ्या शाळेत प्रवेश घेवून देण्याची ऐपत नसल्याने त्यांनी सरदारनी प्रतापसिंह जनता विद्यालयात राहुलचा शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचे निश्‍चित केले. एका चाळीत राहणारा व सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा शिक्षणात कितपत प्रगती करेल? याचे उत्तर सर्वांना कमी कालावधीतच मिळाले. राहुलला लहानपणापासून अभ्यासाची विशेषत: वाचनाची गोडी लागली. शालेय जीवनापासून टॉपर अशी ओळख निर्माण करणार्‍या राहुलने थिएटर, अ‍ॅथलेटिक्स, वादविवादामध्येही चुणुक दाखवली. मात्र सर्वांना लक्षात राहीले त्याचे प्रचंड वाचन!

याबद्दल राहुल नार्वेकर सांगतात की, ‘त्या दिवसांमध्ये टाइम आणि फॉर्च्युन मासिके खरेदी करणे मला परवडणारे नव्हते म्हणून रद्दीवाल्याकडून मासिके आणि पुस्तके मिळवून ते वाचायचे असा फंडा शोधून काढला होता. ही मासिके मला प्रेरणा देणारी होती आणि त्यांनी मला आशा दिली. मी कधीही स्वप्न पाहणे थांबवले नाही.’ शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात पॉकेटमनीसाठी किंबहुना घरच्यांकडून पैसे मागण्याची वेळ येवू नये म्हणून डिलिव्हरी बॉयसारख्या बर्‍याच लहान नोकर्‍याही राहुल यांनी घेतल्या, अगदी रात्रीच्या शिफ्टमध्ये वॉर्ड बॉय म्हणून रूग्णालयात काम करणे, शिकवणी घेणे, दिवाळीच्या वेळी फटाके आणि कंदील विक्री करणे आणि गाडीवर टरबूज विक्री करणेदेखील केले. या रोजगारांमुळे राहुलमधील स्वप्न ढासळू शकले नाही. तो वाचत आणि स्वप्नवत राहिला.

पदवी घेताना राहुल यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि फी भरण्यासाठी पैसे नसल्याने महाविद्यालये बदलावी लागली. त्यांना के.जे.सोमैया कॉलेज, विद्याविहार, मुंबई सोडावे लागले आणि त्यानंतर दुसर्‍या वर्षी के.सी. कॉलेज प्रवेश घेतला पण तिथेही शिक्षणासाठी पैसे कमविण्यासाठी नोकरी करावी लागत असल्यने नियमित कॉलेजला जाता आले नाही परिणामी पुरेसे हजेरी नसल्याने त्याला परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात आली. शेवटी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पत्रव्यवहाराद्वारे पदवी पूर्ण केली.

पुढे राहुल यांनी बुरहानी इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस एन्टरप्रेन्योरशिपमधून बिझिनेस एन्टरप्रेन्योरशिप पूर्ण-वेळ अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. राहुल म्हणतात, मी टीएसएन – टेलिशॉपिंग नेटवर्क कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. शिक्षणासाठी पैसे कमविण्यासाठी संध्याकाळी 6.30 वाजता ते 2.30 वाजेच्या शिफ्ट मध्ये ग्राहक सेवा अधिकारी म्हणून काम केले. तिथे मला रॉनी स्क्रूवालाला कामावर पाहण्याची संधी मिळाली, जी माझ्या जीवनात प्रचंड प्रेरणादायी ठरली. याकाळातही राहुलच्या महाविद्यालयाची समस्या कायमच राहिली आणि त्याला जास्त प्रश्न विचारल्याबद्दल उद्योजकतेच्या शिक्षणातून काढून टाकण्यात आले.

राहुल म्हणतात, या काळात माझ्या जीवनातील टर्निग पॉईंट ठरला तो केबल व्यवसाय… कॉलेजच्या काळात मी केबलवर जाहिराती विकण्याचा पहिला उपक्रम सुरू केला. यातून चांगले पैसे हाती येत असल्याने. त्यानंतर 1999 साली पाच मित्रांनी एकत्र येत त्यांनी मुंबईत एशियामधील पहिले संगीत चॅनेल – चॅनेल ऑक्सिजनची स्थापना केली. या चॅलल्सच्या माध्यमातून चांगला पैसा मिळू लागल्याने, आता आपण जीवनात यशस्वी झालो आहोत, असे वाटू लागताच प्रतिस्पधींमुळे ते व्यवसायात फार काळ टिकू शकले नाही. यामुळे पहिले पाढे पन्नास या म्हणी प्रमाणे त्यांची अवस्था झाली. आयुष्यात शुन्यातून सुरुवात केली होती आणि प्रवास पुन्हा शुन्यावर येवून थांबला. मात्र ‘काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया पर्यंत लवकर पोहचते, कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.’

दरम्यानच्या काळात राहुल दिल्लीला शिफ्ट झाले कारण पल्लवी नामक तरुणीला आपला जीवनसाधी म्हणून निवडले होते. पल्लवी दिल्लीत रेडिओ मिर्ची या चॅनलवर लोकप्रिय आरजे होती. राहुल यांनी दिल्लीत गेल्यानंतर एका एजन्सीमध्ये काम केले. मात्र येथेही अपयश त्यांची पाठ सोडत नव्हते. लग्नाच्या दिवशी त्यांना नोकरी गमावल्यामुळे त्यांना हनीमूनचा प्लॅन बाजूला ठेवून पुढे काय करायचे? या प्लॅनवर काम करावे लागले. काही दिवसांनंतर, त्यांनी दिल्लीत जनकपुरी येथे एका कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करायला सुरुवात केली. येथे त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्य बहरले. यानंतर त्यांनी आयआयएम कलकत्ता येथून एक कोर्स पूर्ण केला. ज्यामुळे त्यांच्या कामाची कक्षा अधिक रुंदावली, नवीन मार्ग दिसू लागले.

त्यादरम्यान त्यांची पत्नी पल्लवी जी त्या वेळी सर्वोच्च आरजेपैकी एक होती, त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. सर्व काही मिळाल्याचा आनंद साजरा करण्याआधीच पल्लवी यांना ‘मायस्टानिया ग्रॅव्हिस’ नावाचा आजार जडल्याचे निदान झाले ज्यामुळे पल्लवी यांनी स्वत:चा आवाज तात्पुरता गमावला. त्यांच्यासाठी हा एक अतिशय कठीण टप्पा होता आणि पल्लवीवर शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन होते. लहान मुलगा व पत्नीकडे लक्ष देण्यासाठी राहुल यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पल्लवी यांनी योगासने व प्राणायामांमुळे चमत्कारीकरित्या पुनर्प्राप्ती केली आणि त्या पुन्हा एकदा ऑन एअरवर गेल्या आणि रेडिओ मिर्चीने त्यांच्या परत येण्याची खूण म्हणून एक मोहीम राबविली. याकाळात राहुल यांनी काही काळ डीएलएफसोबत काम केले. पुढे राहुल यांनी एनडीटीव्हीसोबत काम करतांना 2009 मध्ये फॅशन अ‍ॅण्ड यू डॉट कॉमचे सहसंस्थापक म्हणून नवी इनिंग सुरु केली. याकाळत एनडीटीव्ही संपूर्ण जगात डिझायनर कपड्यांच्या विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यास उत्सुक होते. यानंतर राहुल यांनी 2013 मध्ये इंडियनरूट्स डॉट कॉमची सुरूवात केली ज्यासाठी त्यांनी पाच दशलक्ष डॉलर्सची फंडिग मिळवली. पुढे ज्याचे मूल्यांकन 85 दशलक्ष डॉलर्स इतके झाले. यासाठी त्यांनी 2014 साली स्टार रिटेलरचा ‘इमर्जिंग कॉन्सेप्ट ऑफ द ईयर अवॉर्ड’ मिळाला. त्यासाली इंडियन रूट्स डॉट कॉमने 70 हजारपेक्षा जास्त डिझाइनर्स सादर करत भारतासह अमेरिकेतूनही मोठा व्यवसाय मिळवला.

राहुल म्हणतात की, याकाळात मी अनेक चढ उतार पाहिले. यश-अपयश देखील जवळून पाहिले. यश मिळाले तेंव्हा हुरळून गेलो नाही किंवा अपयश मिळाल्यानंतर खचून गेलो नाही. मी प्रत्येक आहे ती परिस्थिती स्वीकारली आणि पुन्हा नव्या जोमाने सुरुवातीपासून सुरुवात केली. एखाद्या स्प्रिंगप्रमाणे माझ्यावर जितका दबाव आला तितक्याच ताकदीने मी उसळी घेतली. याकाळात मी एक गोष्ट शिकलो जी सर्वांनी विशेषत: ज्यांना यशस्वी उद्योजक व्हायचे आहे, त्यांनी लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे….बेशरम बना…कोण काय म्हणतयं त्याकडे लक्ष देवू नका, जी गोष्ट समजत नाही त्यासाठी समोरच्याला कटांळा येईपर्यंत प्रश्‍न विचारत रहा…..यश तुमचेच आहे.

जिंदगी में कुछ फैसले बहुत सख्त होते हैं और यही फैसले जिंदगी का रुख बदल देते हैं!
संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है,
जिस-जिस पर ये जग हँसा है, उसीने इतिहास रचा है.