मुंबईचे ‘मराठी’पण टिकावे!

0

दहा महापालिका आणि 25 जिल्हापरिषदांसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल पाहता त्यात भाजपच्या बाजूने जनमत मोठ्या प्रमाणावर गेल्याचे स्पष्ट होते. सर्वच ठिकाणच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरल्या. तेथे अनेक ठिकाणी आधीच्या सत्ताधार्‍यांना धक्का देत भाजपने चांगले यश मिळवत सत्ता संपादनाची तयारी सुरू केली असल्याचे चित्र आहे. शिवसेनेला ठाणे महापालिकेत बहुमत मिळाल्याने या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अत्यंत प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक (84) जागा जिंकणारा पक्ष ठरला असला, तरी स्वपक्षाचा महापौर बसवण्यासाठी आवश्यक 114 नगरसेवकांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी अपक्ष व अन्य पक्ष नगरसेवकांच्या मदतीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. 82 जागा जिंकणारा भाजपही महापौरपदाच्या शर्यतीत होता. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मुंबई मनपातील महापौर, उपमहापौर व अन्य पदांच्या निवडणुका लढणार नसल्याचे जाहीर केले नि ही निवडणुक सेनेसाठी सोपी झाली. तथापी महापालिका निवडणुकीत भाजपने मुंबईतील मराठी माणसांची मते फोडली हे कुणीही नाकारणार नाही. मुंबईतील मराठी माणसांची मते प्रभागातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष अशा उमेदवारांना मिळाली म्हणजेच या मतांचे विभाजन झाले, तर भाजपलाही गुजराती अन्य भाषिक मतदारांप्रमाणे मराठी माणसांनी मते दिलीच. या मतांमुळेच भाजपची घोडदौड झाली तर मराठी मतांच्या फुटीमुळे सेनेला मोठा फटका बसल्याशिवाय अन्य भाजपव्यतिरिक्त अन्य पक्षांनाही फटका बसला. मुंबईत भाजपचे सदस्य वाढले त्यात अमराठी सदस्यांची संख्या वाढली. मराठी उमेदवार पराभूत झाले. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळे करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला जात असतो, त्याबाबत तसे काही होणार नसल्याचा खुलासा भाजपकडून केला जातो. यात सत्य असत्य किती हे आरोप करणार्‍यांना आणि आरोप खोडणार्‍या भाजप मंडळींना माहीत आणि हा डाव खरेच खर्‍या अर्थाने साधला जाईल का? याचेही उत्तर काळ देईल. मात्र, एक खरे की या निवडणुकीत भाजपने मराठी मते फोडली. ही मते या पक्षाला लाभदायी आणि मोठे यश देणारी ठरली व भाजपचा अमराठी उमेदवार निवडून देण्यात हातभार लावणारीही ठरली. ती आकड्यात नि टक्केवारीत किती हा स्वतंत्र विषय. मात्र, मराठी मतदारांनी भाजपला चांगली साथ दिली, यात प्रस्थापित पक्षांना कंटाळलेला, बदल हवा या मासिकतेतला आणि भाजपच्या प्रवाहात वाहून जाणारा युवा मतदार आहे. शिवाय मतदार याद्यांमधून गायब झालेली मते कुणाच्या पथ्यावर गेली असती याचाही अंदाज कसा मिळावा, कदाचित निकाल निर्णायक ठरवणारी यातील लाखो मते ठरली असती.

मुंबईत शिवसेनेला यश येणे, महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असणे म्हणजे मुंबई मराठी माणसाचीच, असा संदेश जातो, तो दिला- मानला जातो. मराठी महापौर, उपमहापौर, अन्य पदांवरही मराठी नगरसेवक हे चित्र मुंबईकर मराठी माणसांना नेहमीच आपलेसे नि दिलासादायी वाटले आहे. मुंबईत मराठीपण टिकलेच पाहिजे, मराठी ठसा असायलाच हवा, अशी भावना मुंबईकर मराठी माणूस आणि राज्यातील तमाम मराठी माणसांना वाटत आली आहे. महापालिका शिवसेनेकडे असणे म्हणजे हे सारे आले अशीही भावना आहे. त्यामुळे या वेळी नेमके होईल, याबाबतची उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मास्टर स्ट्रोकने सेनेचा विजय सोपा होतानाच अन्य राजकीय रणनितीलाही चाप बसेल असे म्हटले तर वावगे ठरु नये. मुंबई महपौरपदाकडे लक्ष वेधले तर 1970 आधी मुंबई महापालिकेत 10 पैकी अवघे 3 महापौर मराठी व 7 अमराठी होते हे वास्तव मराठी माणसांना धक्कादायी वाटल्याखेरीज राहणार नाही. 1966 साली स्थापन झालेल्या शिवसेनेने मुंबईत प्रस्थापितांशी लढतच अल्पावधीत पाय रोवले. 1985 साली महापालिकेवर सत्ता आली. छगन भुजबळ पहिले महापौर (व त्यानंतरही 1991) झाले. त्यानंतर काँग्रेसची सत्ता, त्यानंतर पुन्हा (1996) शिवसेना सत्तेवर आली ती आतापर्यंत. दरम्यानच्या या काळात काँगे्रसने आर. आर. सिंह (1993 – 94) वगळता सारेच महापौर मराठी झाले. दत्ता नलावडे, डॉ. रमेश प्रभू, चंद्रकांत पडवळ, शरद आचार्य, दिवाकर रावते, चंद्रकांत हांडोरे, निर्मला सामंत-प्रभावळकर, रा. ता. कदम, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, नंदू साटम, हरेश्‍वर पाटील, महादेव देवळे, दत्ताजी दळवी, डॉ. शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, सुनील प्रभू व स्नेहल आंबेकर यांनीच महापौरपद भूषवले. याचा अर्थ मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून मराठी माणूसच राहिला, मराठी माणसानेच शहराचे नेतृत्व केले आणि मुंबई मराठी माणसाचीच हा संदेश सर्वदूर पोहोचला. मात्र, याखेपेस महापालिकेत युती म्हणून सत्तेत राहिलेले शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढले आणि त्यांच्या स्वबळातही बरेचसेे साम्य ठेवणारा कौल मतदारांनी दिला. त्यातही कोणासही बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली. या स्थितीचा शेवट कसा होईल, महापौरपद निवडणूक युतीने लढतात की स्वबळाने निवडणूक लढतात, याबाबतची उत्सुकता आता संपली आहे आणि मुंबईचा मराठी ठसा कायम राहो, हीच तमाम मुंबईकर नि मराठी माणसाची मानसिकता मात्र कायम आहे.

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला जात असतो, त्याबाबत तसे काही होणार नसल्याचा खुलासा भाजपकडून केला जातो. यात सत्य – असत्य किती हे आरोप करणार्‍यांना आणि आरोप खोडणार्‍या भाजप मंडळींना माहीत आणि हा डाव खरेच खर्‍या अर्थाने साधला जाईल का? याचेही उत्तर काळ देईल. मात्र, एक खरे की या निवडणुकीत भाजपने मराठी मते फोडली. ही मते या पक्षाला लाभदायी आणि मोठे यश देणारी ठरली व भाजपचे अमराठी उमेदवार निवडून देण्यात हातभार लावणारीही ठरली. आता शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौरपद हे मराठी माणसाकडे जातानाच शहराचे एकूणच ‘मराठी’पण जपले जावे, ही मुंबईकरांची अपेक्षा आहे.
रामनाथ चौलकर