मुंबईची पुन्हा रणजीच्या विजेतेपदाच्या दिशेने कूच

0

रायपूर : गतविजेत्या मुंबईने पुन्हा एकदा रणजी विजेतेपदाच्या दिशेने कूच करताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. प्रत्येकी पाच बळी टिपणाऱ्या अभिषेक नायर आणि विजय गोहिल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने अटीतटीच्या झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत हैदराबादचे आव्हान मोडीत काढले. कालच्या सात बाद 121 वरून पुढे खेळताना हैदराबादच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट प्रतिकार केल्याने मुंबईला अवघ्या 30 धावांनीच विजय मिळवता आला. डावखुरा फिरकी गोलंदाज विजय गोहिल याच्या प्रभावी माऱ्यामुळे हैदराबादविरुद्धच्या रणजी उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर होती. हैदराबादला 232 धावांचे आव्हान दिल्यानंतर मुंबईने चौथ्या दिवसाच्या अखेरीस त्यांची 7 बाद 121 अशी अवस्था केली.

अनिरुद्धची झुंज अपयशी
बुधवारी खेळाला सुरुवात झाल्यावर हैदराबादच्या बी. अनिरुद्ध आणि सी. मिलिंद यांनी चिवट प्रतिकार केला. दोघांनीही आठव्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी करत मुंबईची डोकेदुखी वाढवली. पण मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अभिषेक नायरने मिलिंद (29), मोहम्मद सिराज (0) आणि रवी किरण (1) यांना बाद करत हैदराबादचा दुसरा डाव 201 धावांवर संपुष्टात आणला. हैदराबादकडून एकाकी लढत देणारा अनिरुद्ध 84 धावांवर नाबाद राहिला. मुंबईच्या अभिषेक नायरने या लढतीत एकूण नऊ बळी टिपले.
तत्पूर्वी हैदराबादला विजयासाठी २३२ धावांचे आव्हान दिल्यानंतर चौथ्या दिवसअखेर मुंबईने त्यांची ७ बाद १२१ अशी केविलवाणी अवस्था केली होती.

समित गोहेलचा विश्वविक्रम
ओदिशा विरुद्ध सुरु असलेल्या रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गुजरातच्या सलामीवीराने नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. गुजरातच्या सामित गोहेलने सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलामीला आलेल्या सामितने नाबाद 359 धावा फटकावल्या. यापूर्वी सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम सरेच्या बॉबी अबेल यांच्या नावावर होता. त्यांनी 1899 साली ओव्हलच्या मैदानावर सॉमरसेट विरुद्ध नाबाद 357 धावा केल्या होत्या. गोहेलने 723 चेंडूंचा सामना करताना 359 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 45 चौकार आणि षटकार लगावला. गुजरातचा दुसरा डाव 641 धावांवर आटोपला.

गुजरात-ओडिशा सामना अनिर्णीत
सुमित गोहेलच्या झंझावाती त्रिशतकानंतरही गुजरातला विजय मिळविता आला नाही. हा सामना शेवटच्या अनिर्णीत राहिला. पहिल्या डावात चिराग गांधी ८१ आणि रुष कलारीयाच्या ७३ धावांच्या बळावर २६२ धावा केल्या होत्या. ओडीशाला पहिल्या डावात १९९ धावांवर गुंडाळल्यानंतर गुजरातने समितच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ६४१ धावांचा डोंगर रचत अंतिम दिवशी ओडीशाला विजयासाठी 706 धावांचे लक्ष्य दिले होते. दुसऱ्या डावात ओडिशाने पडझड न होऊ देता २२ षटकात १ बाद ८१ धावा केल्या. शुभ्रांषु सेनापतीने ५९ धावा केल्या. पहिल्या डावात ५ बळी घेणारा जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.