‘मी.. सुमनबाईंचा नातू..’ सांगून अनेकांना घातला गंडा!

0

जळगाव। मला ओळखले का? मी सुमनबाईंचा नातू, असे म्हणत बँकेतून बाहेर पडणार्‍या एखाद्या वृध्द, प्रौढ नागरिकाचा विश्वास संपादन करून किराणा तसेच इतर साहित्य खरेदीचे कारण सांगून काही मिनिटात पैसे परत करतो, हा फंडा वापरत कांचननगरातील संशयित डिगंबर कौतिक मानकर याने जिल्हाभरात अनेकांना गंडविले असल्याची माहिती समोर आली आहे. यातच त्याने भुसावळ, जामनेर, फैजपूर तसेच बर्‍हाणपुर येथे देखील अनेकांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले. याबरोबर फक्त बुधवारी आठवड्या बाजाराच्या दिवशीच डिगंबर हा बँकेतून पैसे काढणार्‍या नागरिकांना गंडा घालत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

अनेकांना गंडविले: शनिपेठ पोलिसांनी संशयित डिगंबर मानकर बाबत फैजपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी फैजपूर येथील एका बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून येत असलेल्या संशयिताचे छायाचित्र पाठविले होते. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित व ताब्यात घेतलेला संशयित एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह कर्मचार्‍यांनी बुधवारी रात्री जळगाव गाठले आणि डिगंबरला मानकरला शनिपेठ पोलिसांकडून ताब्यात घेतले़ दहा ते पंधरा वर्षापासून याप्रकारे डिगंबरने जिल्हाभरातील अनेकांना गंडविले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़

पैसे घेवून रफूचक्कर: डिगंबर विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यासह भुसावळ तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़ त्या-त्या ठिकाणचा बाजार असला की डिगंबर गावातील बँक शोधतो. याठिकाणी पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकावर लक्ष ठेवतो. त्याच्या हातात पैसे पडतात डिगंबर संबंधिता हेरतो. नातेवाईक असल्याचे भासवत विश्वास संपादन करतो. डिगंबरच्या अंगावरील कपड्यांमुळे तसेच त्याच्या बोलण्यामुळे कुणालाही साधा संशयही होत नाही़ अशा पध्दतीने तो पैसे घेवून रफूचक्कर होतो.

शनिपेठ पोलिसांनी पकडले
डिगंबर मानकर विरोधात फैजपूर येथे एकाला 12 हजार रुपयांत गंडविल्या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी डिंगबर हा जळगावात असल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, मोतीलाल पाटील, उमाकांत चौधरी, संजय धनगर. जितेंद्र सोनवने, अनिल धांडे यांच्या पथकाने सापळा रचून आकाशवाणी चौकातून ताब्यात घेतले होते़ त्याची चौकशी केली असता त्याने फैजपूर येथील गुन्ह्याची कबूली दिली होती.