# मी टू ! भरकटायला नको

0

लैंगिक शोषणाविरोधात ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आवाज उठवण्यासाठी जगभरात सध्या #मी टू कॅम्पेन म्हणजेच मी सुद्धा अभियान सुरु आहे. हॉलिवूड अभिनेत्री अलिसा मिलानोने सुरु केलेल्या या अभियानाअंतर्गत जगभरातील महिला त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटना सांगत आहेत…आता हे वादळ भारतातही पसरले आहे. याच्या तडाख्यात केवळ चित्रपटसृष्टीतील नव्हे तर विविध क्षेत्रात नामांकित ओळखल्या जाणार्‍या व्यक्ति सापडल्या आहेत. मात्र, आता याला वादाची दुसरी किनार आहे ती म्हणजे दहा-पंधरा वर्षांनंतर का आरोप करता?

5 ऑक्टोबर 2017 रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रात अ‍ॅशले जड या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. यामध्ये तिने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. हार्वे म्हणजे सहा ऑस्कर पारितोषिक प्राप्त चित्रपटांचे निर्माते. नंतर मुलाखतीच्या आधारे या वृत्तपत्राने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री, तसेच हार्वे यांच्या मीरामॅक्स कंपनीतील महिला कर्मचार्‍यांनी अशा अनेक घटना सांगितल्या. वृत्तपत्रात त्याला प्रसिद्धी मिळाल्यावर हार्वे यांची त्यांच्या द वेनस्टेइन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली. 12 ऑक्टोबर 2017 ला इसा हॅकेट या दूरचित्रवाणी निर्मातीने अ‍ॅमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. त्यांनतर प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 16 ऑक्टोबर 2017 रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर मी टू हा हॅशटॅग वापरून तिने हॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणार्‍या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर #मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे 40 हजार लोकांनी की ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या अशांनी हा हॅशटॅग वापरला. या नंतर अनेक अभिनेत्री आणि सामान्य स्त्रियांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या, तसेच न्याय मागितला. ट्विटर संकेत स्थळावर जरी मिलानो हिने मी टू चा वापर प्रचलित केला असला तरी हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय तराना बर्क या महिला हक्क कार्यकर्तीला जाते. 1997 साली एका तेरा वर्षाच्या लैंगिक शोषणाची शिकार बनलेल्या मुलीशी त्या बोलत होत्या. तिला कसा प्रतिसाद द्यावा हेच त्यांना सुचत नव्हते. ’मी सुद्धा’ अशा अत्याचाराची शिकार आहे हे सुद्धा त्या तिला सांगू शकल्या नाहीत. अनेक वर्ष हा प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिला. या संभाषणानंतर 10 वर्षांनी तराना बर्क यांनी ’जस्ट बी’ या ना-नफा संस्थेची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराची आणि हिंसेची शिकार बनलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी हि संस्था काम करते. तराना यांनी या चळवळीला नाव दिले मी टू! आता हेच अभियान किंवा चळवळ भारतात सुरूवात झाली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या मागोमाग आलोक नाथ, विकास बहल, कैलाश खेर, चेतन भगत, उत्सव चक्रवर्ती आदी बॉलिवूडकरांची नावे महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी समोर येत आहेत. सोशल मीडियावर देखील कलाकार आणि सर्वसामान्य मंडळी व्यक्त होत या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. बॉलिवूडमध्ये उसळलेले हे वादळ अद्याप तरी शांत होईल असे वाटत नाही. उलटपक्षी यातून बॉलिवूडचा छुपा चेहरा समोर येतोय की काय हे पाहणे निर्णायक ठरेल. मीडिया जगतातील अनेक महिलांनीही आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या गोष्टी उघड केल्या. त्यानंतर अभिनेता रजत कपूर यांनी माफी मागितली, तर कॉमेडी ग्रुप एआईबीच्या दोन विनोदवीरांची शोमधून गच्छंती करण्यात आली आहे. बॉलिवूड, हॉलिवूडला असे आरोप नवीन नाहीत. काही वर्षापूर्वी कास्टिंग काउचवरूनही असाच गदारोळ सुरू झाला होता. बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड किंवा कोणतेही क्षेत्र असो, कॉलेज, रस्ते, गल्लीबोळ असे सगळीकडेच महिला, मुलींना त्यांच्यावर होणार्‍या शेरेबाजीला, अश्‍लील संवादाला, होणार्‍या पाठलागाला, प्रसंगी लैंगिक अत्याचाराला, लैंगिक छळांना तोंड द्यावे लागते. अशा अनेक प्रसंगांमध्ये त्या आवाज उठविण्याऐवजी गप्पच बसतात. कधीतरी हे गप्प बसणे सहन न झाल्यामुळे झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या त्यांच्या तोंडून बाहेर येतात. ’मी टू’ या चळवळीतूनही हेच समोर आले आहे. अशा प्रकारच्या घटनांमधून कायम एकच प्रश्‍न उपस्थित केला जातो, ’या महिला एवढी वर्षे गप्प का बसल्या? त्यांच्यावर जेव्हा अन्याय झाला, त्याचवेळी त्यांनी आवाज का उठविला नाही?’. याचे उत्तर आहे, आजही आपल्याकडे व्यक्तिपूजेचे स्तोम आहे. ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आला आहे, त्याचे अनेक अंधभक्त असतात. त्यांना हा आरोप सहन होत नाही. त्यातून होणार्‍या परिणामाच्या भीतीमुळे आणि आपल्या बाजूने कोणीच उभे राहणार नाही असे वाटल्यामुळे, अनेक महिला गप्प बसतात. हे गप्प बसून सहन करणे त्यांच्यात धुमसत असते. अशा प्रकारच्या आरोपांची राळ उठते, तेव्हा या प्रकरणात आता काय होणार आहे। न्यायालयात दावा दाखल केला, तरी त्याचे फलित काय होणार आहे, या प्रश्‍नांबरोबर आणखी एक प्रश्‍न उपस्थित केला जातो, तो म्हणजे ’एवढी वर्षे ही शांत कशी राहिली?’ ’आता तिला काहीतरी फायदा करून घ्यायचा असेल किंवा समोरची व्यक्ती प्रसिद्ध असल्यामुळे त्याची बदनामी करायची आहे.’ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांमध्ये एकच प्रश्‍न सतावत राहतो, का ती सहन करत राहिली आणि आता बोलून काय होणार? ’आजच्या आधुनिक काळात कितीही महिला सक्षमीकरणाच्या, महिला समानतेच्या गोष्टी केल्या जात असल्या, तरी समाज काय म्हणेल, या विचाराने प्रत्येक वर्गातील महिला गप्प बसतात. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला कोणत्या वातावरणात वाढल्या आहेत, त्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी कशी आहे, त्यांच्या घरचे नियम, संस्कृती कशी आहे, त्यांना कसे वाढविण्यात आले आहे, या सर्वांचा त्यांच्या कामावरही परिणाम होत असतो. प्रसंगी घरच्या लोकांचा रोष पत्करून महिलांनी वेगळे क्षेत्र निवडलेले असते. आपल्या करिअरवर परिणाम व्हायला नको, असा विचार करून त्या गप्प बसतात. हे गप्प बसणे सहन न झाल्यामुळे त्याचा कधीतरी उद्रेक होतो…मात्र, या चळवळीचा नेमका वापर अन्याय आणि सत्य मांडण्यासाठी याचसाठी होणे आवश्यक आहे. कोणाचीतरी मुद्दाम बदनामी करण्यासाठी आपला वापर कोण करत तर नाही ना याची दक्षता व भान राखणे गरजेचे आहे.

Copy