Private Advt

मी अनाथांची माय झाले, नाथाभाऊ तुम्ही या लेकरांचे मामा व्हा !

स्व.सिंधुताई सपकाळ यांचे ‘ते’ 32 मिनिटांचे भाषण आजही भुसावळकरांच्या स्मरणात

भुसावळ (गणेश वाघ) : हजारो निराधार, अनाथांना आधार देणार्‍या व खर्‍या अर्थाने ‘आई’ झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका स्व.सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री पुण्यात हृदयविकाराने निधन झाल्यानंतर देशभरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. स्व.सिंधुताई या 14 फेब्रुवारी 2014 रोजी भुसावळात आल्या होत्या. त्यांच्याहस्ते त्यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ‘संघर्षयात्री’ पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते. या कार्यक्रमात सिंधुताईंनी सुमारे 32 मिनिटे केलेले भाषण भुसावळकरांच्या आजही स्मरणात आहे. संकटे त्याच्यावरच येतात ज्याच्यात पेलण्याची ती शक्ती आहे, मी या अनाथांची माय झाले, नाथाभाऊ तुम्ही या लेकरांचे ‘मामा व्हा’, असे भावनिक काळजाला भिडणारे आवाहन या कार्यक्रमात स्व.सिंधुताईंनी केल्यानंतर सारेच गहिवरले होते.

नाथाभाऊंना दिला होता संघर्षयात्री पुरस्कार
भुसावळातील अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सुनील नेवे यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ‘संघर्षयात्री’ पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते. जामनेर रोडवरील ताप्ती स्कूलच्या पटांगणावर शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2014 रोजी झालेल्या या कार्यक्रमाला हजारो भुसावळकरांनी उपस्थिती दिली होती. पत्नी मंदाकिनीताई खडसे यांनी नाथाभाऊंना किडनी देवून दिलेले जीवदान व त्यानंतर खडसे यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेत पुरस्कार जाहीर झाला होता व पुरस्कार देण्यासाठीदेखील तोलामोलाच्या व संघर्षातून उभारी घेतलेल्या स्व.सिंधुताई सपकाळ यांची निवड करून त्यांना भुसावळ भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते.

…और मौत कभी रीश्वत नहीं लेती
भुसावळातील कार्यक्रमात 32 मिनिटे केलेल्या भाषणात स्व.सिंधुताईंनी देशप्रेम, समाज सेवेवर भाष्य केले होते. जाताना रीकाम्या हाताने जायचे आहे त्यामुळे चांगले काम करून जा, असे आवाहन त्यांनी केले होते. वेदनेचा वेद होतो व वेदनेने मला समाजसेवा करायला शिकवले, असे सांगून त्यांनी ‘कफन को जेब नही होती और मौत कभी रीश्वत नहीं लेती’, असे सांगून उपस्थितांना अंतर्मुख केले होते.

….तेव्हाच विश्व उभे राहते समाजसेवेचे
काळीज कुरतडणार्‍या दुःखातून नाथाभाऊ उभे राहिले व पत्नीने केलेली किडनी दानाची दुर्मीळ घटना असल्याचे सांगून त्यांनी मंदाताई खडसे यांचे तोंडभरून कौतुक केले होते. ‘बाई जेव्हा पाठीशी उभी राहते, तेव्हाच विश्व उभे राहते समाजसेवेचे असे सांगून नाथाभाऊ’ हे आईच्या काळजाचे असून त्यांनी झोपडीतला अंधार घालवला, गरीबांची चुल पेटवली व अनेक निराधारांना नोकरी दिल्याचे त्यांनी सांगत नाथाभाऊंचे तोंडभरून कौतुक केले होते. आपल्याला जेव्हा कुणी ओळखत नव्हते तेव्हा नाथाभाऊंनी आधार दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. आई नाही तर काही नाही अन् देश नाही तर काहीच नाही, अशी आठवणही त्यांनी सांगून तीन वेळा आत्महत्या करण्याचा मनात विचार आल्याची प्रांजळ कबुलीही दिली.

सिंधुताईंचे कार्य चालवणे हीच खरी श्रद्धांजली : प्रा.सुनील नेवे
किडनी रोपण शस्त्रक्रियेनंतर नाथाभाऊंनी केलेल्या संघर्षाला शब्दच नाही. नाथाभाऊंचा सन्मान करण्यासाठी सन्मान करणारी व्यक्तीदेखील तितकीच तोला-मोलाची असावी म्हणून सिंधुताईंना आमंत्रीत करण्यात आले होते कारण त्यांचा संघर्षदेखील वाखाणण्याजोगा होता व त्यांनी लागलीच होकारदेखील दिला. दुर्दैवाने स्व.सिंधुताई आज आपल्यात नाही मात्र जगासमोर त्या एक आदर्श उदाहरण असून पुढच्या अनेक पिढ्या सिंधुताई अजरामर राहतील ते एका आईच्या रूपाने. सिंधुताई आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचे कार्य आपण सर्वांनी मिळून चालवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे भावोद्गार भुसावळातील नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केले.