मिनी ट्रॅक्टरसाठी स्वयंसहायता बचत गटांना अर्ज करण्याचे आवाहन

0

जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्ट्रर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी शासकीय अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी बचत गटांनी परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालयात जमा करावे. असे आवाहन खुशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

अनुदानाच्या पात्रतेसाठी अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. मिनी ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने मान्यताप्राप्त उत्पादकांकडून प्रथम खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर खातरजमा केल्यावर शासकीय अनुदानाच्या 50 टक्के रक्कम बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल उर्वरित 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्ती पेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. 3.15लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबधित बचत गटाला स्वत: खर्च करावी लागेल.स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व हे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे. निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे (परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

या अटी व शर्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांनी नोंदणी प्रमाणपत्र, बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत,गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकांशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, बचत गटाचे घटनापत्र,बचत गट कार्यकारणी सदस्याची मुळ यादी,सदस्याचा स्वत:चा जातीचा दाखला, को-या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख, मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा अंतर्गत आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात (लागू असल्यास) आणि विमा उतरविणेचा खर्च बचत गटांना करावा लागेल. बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावा व परिपूर्ण अर्ज सादर करावा. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी कळविले आहे.