Private Advt

मालेगावातील मोबाईल चोरटे धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात

चोरी केलेले 20 मोबाईल जप्त : अनेक गुन्ह्यांचा होणार उलगडा

भुसावळ/धुळे : दुचाकीवरून येत धूम स्टाईल मोबाईल लांवबणार्‍या मालेगावातील त्रिकूटाच्या धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून तब्बल चोरीच्या 20 मोबाईल व दुचाकीसह तीन लाख 72 हजार 778 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरीद अहमद मोहंमद हुसेन (22, रा.चंदनपुरी गेट, भायकळा झोपडपट्टी, मालेगाव, जि.नाशिक), मोहंमद आदिल मोहंमद अजमल (25, हिरापुरा, झांजर देवलच्याजवळ, मालेगाव, जि.नाशिक), अरबाज मोहम्मद हसन अन्सारी (22, आयशा नगर, जावेद व्हिडिओजवळ, मालेगाव, जि.नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

धूम स्टाईल लांबवला होता मोबाईल
धुळे शहरातील अग्रवाल नगरातील गुरमितसिंग दर्शनसिंग बदान (57, अग्रवाल नगर, प्लॉट नंबर, 73, धुळे) हे बुधवार, 20 एप्रिल रोजी घराजवळ मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना मोबाईलवर कॉल आला व त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांचा 45 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना मालेगावातून अटक करण्यात आली. दोघा आरोपींनी अरबाज मोहम्मद हसन अन्सारी यास मोबाईल विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक केली तसेच गुन्ह्यात वापलेली दुचाकी जप्त केली. संशयीत आरोपी मोहम्मद आदिल मोहमद अजमल विरोधात ओझर, आझादनगर, पवारवाडी (मालेगाव), मालेगाव शहर पोलिसात तर अरबाज मोहमद हसन अन्सारी याच्यावर देखील नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद पवार, हवालदार पंकज चव्हाण, कैलास वाघ, भुरा पाटील, संदीप कढरे, अविनाश पाटील, स्वप्नील सोनवणे, चेतन झोलेकर, इंद्रजीत वैराट, हेमंत पवार, प्रशांत पाटील, शरद जाधव, सोमनाथ चौरे यांच्या पथकाने केली.