Private Advt

मालवाहू गाडीची जबर धडक : बोरखेड्याचा दुचाकीस्वार ठार

चाळीसगाव : भरधाव वेगाने जाणार्‍या मालवाहू वाहनाने दिलेल्या जबर धडकेत तालुक्यातील बोरखेडा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवार, 6 रोजी सायंकाळी पावणेसात वाजता शहरातील ओझर-पातोंडा रस्त्यावर घडला. या प्रकरणी पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बोरखेड्याच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
चाळीसगावाहून भडगावकडे भरधाव वेगाने जाणार्‍या छोटा हत्ती या मालवाहू गाडीच्या (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.5825) धडकेत दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.एस.4356) वरील पितांबर आनंदा पाटील (63, रा.बोरखेडा, ता.चाळीसगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास शहरातील ओझर-पातोंडा रस्त्यावर घडला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातानंतर छोटा हत्तीवरील अज्ञात चालक पसार झाला. या प्रकरणी अनिल दयाराम पाटील (बोरखेडा) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.