मालमत्ता कर थकबाकीदारांना 1 जानेवारीपासून 2 टक्के दंड

0

भरणा करण्यासाठी गर्दी; एका दिवसात ८५ लाखांची वसुली

जळगाव:मालमत्ता कराची थकबाकी असणार्‍या मिळकतधारकांना जानेवारी महिन्यापासून दरमहा 2 टक्के शास्ती आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मनपाच्या चारही प्रभाग समिती कार्यालयात सकाळपासून गर्दी सुरु आहे.सोमवारी चारही प्रभाग समिती कार्यालयात 85 लाख 43 लाखांचा भरणा झालेला आहे.
वित्तीय वर्षात मालमत्ता कराचे 75 कोटींची मागणी आहे.आतापर्यंत जवळपास 35 कोटींची वसुली झाली असून 50 टक्के वसुलीचे मनपा प्रशासनासमोर आव्हान ठेपले आहे. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. आता केवळ दोन दिवस शिल्लक असून शास्ती(दंड) टाळण्यासाठी मालमत्ता कर भरण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी 10 वाजेपासून मिळकतधारकांनी गर्दी केली होती. प्रभाग समिती 1 मध्ये 36 लाख 25 हजार,प्रभाग समिती 2 मध्ये 17 लाख 33 हजार,प्रभाग समिती 3 मध्ये 19 लाख 99 हजार,तर प्रभाग समिती 4 मध्ये 11 लाख 77 हजार अशी एकूण 85 लाख 34 हजार रुपयांची वसुली झाली आहे.

प्रभाग समिती 1 मध्ये पाच काउंटर

मनपाच्या 17 मजली प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या प्रभाग समिती 1 च्या कार्यालयात सकाळी 10 वाजेपासून गर्दी झाली होती. मात्र येथील लिपिकांची बदली अन्य विभागात झाल्यामुळे अडचण निर्माण झाली.त्यामुळे मालमत्ता कर भरणार्‍या मिळकतधारकांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या लिपीक कर्मचार्‍यांना बोलावून पाच काउंटर सुरु करण्यात आले.

50 टक्के वसुलीचे मनपासमोर आव्हान

आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 75 कोटींचे उद्दिष्ट आहे.मात्र आतापर्यंत केवळ 35 कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे 50 टक्के वसुलीचे मनपा प्रशासनासमोर आव्हान आहे. वसुली होत नसल्याची वारंवार ओरड केली जाते. मागील वर्षी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर डफडे वाजविण्यात आले होते. आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Copy