मारहाणप्रकरणी सहावा संशयिताला अटक

0

जळगाव : गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ दोन तरुणांना रात्रीच्यावेळी मारहाण झाली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पोलिसांनी गुरूवारी सहाव्या संशयिताला अटक केली. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 7 जानेवारीपर्यंत संशयिताला कोठडी सुनावली आहे.

गोविंदा रिक्षा स्टॉप चौकात 1 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जुनेद शेख अनीस (वय 28, एमआयडीसी परिसर), जुबेर शेख फरिद (वय 29, रा. फातेमानगर) हे आयनॉक्सस थिएटरमध्ये सिनेमा बघितल्यानंतर घरी जात होते. त्या वेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या दहा ते बारा तरुणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्यांनी दोघांना मारहाण केली. तक्रारीवरुन पोलिसांनी मंगळवारी अंकुश मधुकर सुरवाडे (वय 18, रा. गेंदालाल मील), मयूर राजेंद्र सोनार (वय 19, रा. आसोदा रोड), भूषण भरत सोनवणे (वय 18, रा. कानळदा रोड), भूषण अंबादास सपके (वय 22, रा. आसोदारोड) यांना अटक केली होती. त्यांना 7 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी आहे. या प्रकरणातील सहावा संशयीत रुपेश सुभाष काकडे (वय 21, रा. मोहन टॉकीज् परिसर, आसोदा रोड) याला गुरूवारी अटक केली. त्याला न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 7 जानेवारी पर्यंत कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड. प्रवीण पांडे यांनी कामकाज पाहिले.