मायभगिनींचा रोजगाराचा हक्क परत द्या!

0

कोठे बीओटी तत्त्वावर, कुठे केअरटेकर म्हणून तर कोठे आणखी निमित्ताने शेकडो कोटींची सरकारी म्हणजेच जनतेची मालमत्ता धनदांडग्यांच्या घशात घालून त्यांची पोटे अधिकच फुगवली जात असतानाच सातार्‍याहून बातमी आली ती परिवहन खात्याने सातारच्या एसटी आगारातील झुणका भाकर केंद्राची जागा सील केल्याची. वरवर पाहिले तर कोणालाही बरे वाटेल. चला सरकारी मालमत्तांबाबतीत सरकार जागे तर झाले. मलाही बरेच वाटले. पण, नंतर वर्षा देशपांडे जनशक्ति कार्यालयात आल्या आणि कावेबाजी उघड झाली. परिवहन खात्याने नियमांवर बोट दाखवत जप्तीची कारवाई केली खरी. पण, ती कोण्या धनदांडग्याने बळकावलेल्या मालमत्तेविरोधात नाही, तर आपल्या मराठी मातीतील, मराठी मायभगिनींविरोधात!

वर्षा देशपांडे यांचे नाव तसे अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचे. जन्माला येणार्‍या कळीची गर्भातच कत्तल करणारे कत्तलखाने चालवणार्‍या नराधम डॉक्टरांविरोधात त्या धाडसाने मोहीम चालवतात. जीवाचा धोका असतो. माझा परिचय अशाच मोहिमेत झाला. मुंबईतील एका डॉक्टराचा बुरखा टरकावताना आमच्या टीमच्या काम्या भट्टाचार्यने धोका पत्करत स्टिंग ऑपरेशन केले. माझे मित्र आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांची पत्नी (त्यांचे तर खास कौतुक! त्यावेळी त्या गरोदर होत्या!!) खास बुलडाण्यातून आल्या. त्यांनी धोका पत्करत साथ दिली. नंतर न्यायालयात खटला दाखल होताना आमच्याकडे ऑफर आल्या. वर्षा देशपांडेंकडे तर आल्याच आल्या असतील. मात्र, त्यांनी ते प्रकरण हिमतीने लढवले. बोलण्यातून नाही तर अनुभवातून माणसांना पारखायचे असते. या रणरागिणीची खरी हिंमत तेव्हा दिसली. आता त्याच जेव्हा स्वत:च्या दलित महिला विकास मंडळाच्या मायभगिनींची रोजी-रोटी हिरावली जाण्याची करुण कहाणी उद्वेगाने सांगू लागल्या, तेव्हा संवेदनाशून्य कारभाराचा नमुना समोर आला.

दलित महिला विकास मंडळाचे झुणका-भाकर केंद्र आजचे नाही. गेली 25 वर्षे या महिला सातारच्या एसटी आगारात हे केंद्र चालवतात. रास्त दरात, स्वच्छता राखत आपुलकीने तयार केलेले ताजे खाद्यपदार्थ प्रवाशांची भूक भागवतात. व्यवसाय व्रतस्थ निष्ठेने केला जातो त्याचे कारणही तसेच. केंद्रामागे प्रेरणा आहे ती अंधश्रद्धा निर्मूलन लढवय्ये हुतात्मा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची. चळवळीला कष्टाच्या भाकरीचे इंधन मिळालेच पाहिजे, हे डॉक्टरांचे बोलणे वर्षा देशपांडेंच्या मनावर कोरले गेले. त्यांनी ठरवले, आपल्या मायभगिनींना सामाजिक कार्यासाठी राबवताना त्यांच्या पोटाची भूक भागवण्याची जबाबदारीही आपलीच. त्यातूनच 14 एप्रिल 1991 रोजी सामाजिक जाणीवेचे अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते दलित महिला विकास मंडळाच्या या न्याहारी केंद्राचे उद्घाटन झाले. तेव्हापासून एसटीने प्रवास करणार्‍या आपल्या सारख्या हजारोंची सोय करतानाच मायभगिनींना सन्मानाने जगवण्याचे साधनही लाभले. गेल्या 25 वर्षांमध्ये फक्त एकच दिवस, तेही 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांच्या हत्येच्या दिवशी कष्टकरी मायभगिनींना भावना आवरणे कठीण जात असल्याने केंद्राची चूल थंड राहिली. नाहीतर सतत, अविरत काम चालूच राहिले.

अर्थात अडचणी आल्या नाहीत, असेही नाही. जसे काम पुढे जात राहिले तशा अडचणीही येत राहिल्या. सन 1995 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा काहींनी वेगळे प्रयत्न केले. महिलांच्या कष्टामुळे त्या जागेला व्यावसायिक महत्त्व प्राप्त झाल्याने काहींचा डोळा कायमच असावा. मात्र, मनोहर जोशींनी युती सरकारच्या झुणका-भाकर केंद्र योजनेत सामावून घेतले, दिलासा दिला.

आता पुन्हा भाजप-शिवसेनेचे युती सरकार सत्तेवर आहे आणि पुन्हा आता संकट उभे ठाकले आहे. वर्षा देशपांडेच्या म्हणण्यानुसार केंद्राला जप्तीचे कुलूप लावण्यात आले. संस्थेच्या मायभगिनींनी अर्थात ही तुघलकी कारवाई जुमानली नाही. त्यांनीही त्यावर आपला हक्क दाखवणारे कुलूप लावले. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बंद केंद्राबाहेर खाद्यपदार्थ बनवत त्या पुरवत आहेत. गब्बर, धनदांडग्यांना असे बाहेर हाकलले असते तर मलाच नाही अवघ्या महाराष्ट्राला, प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटला असता. शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सत्तेत आलेले, शिवाजी महाराजांचे नाव घेत राजकारण करणारे शिवनीतीनुसार कारभार करीत आहेत. रयतेला साथ देत उन्मतांना लाथ मारत आहेत. मात्र, झाले आहे भलतेच.

परिवहन खात्याचे मंत्री शिवसेनेचे दिवाकर रावते आहेत. त्यांचे समर्थक सांगतात, सत्तेत असूनही सत्तेत जीव न रमणारी, माती आणि माणसांशी नाते टिकवून असणारी जी माणसे असतात, त्यांच्यापैकी एक म्हणजे दिवाकर रावते. तसे रांगडे गडी. मात्र, संवेदना न हरपलेले. त्यांच्याच खात्यात ही मोगलाई सुरू आहे. सातारच्या मायभगिनींची काही थकबाकी असेलही, काही तांत्रिक बाबींची पूर्तता त्यांनी केलीही नसेल, कमी पडल्याही असतील त्या. पण, लगेच जप्तीची कारवाई करणे ही शिवशाही असूच शकत नाही.
रावतेसाहेब, आपल्या हस्तेच कोल्हापुरात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी 2009 मध्ये दारूबंदी कार्यासाठी वर्षा देशपांडे यांचा सत्कार केला होता. जे हात रणरागिणीच्या सत्कार करतात तेच त्यांच्या कार्याचा गळा घोटण्यासाठी नोकरशाही वापरून घेत असतील तर कृपया आपण सावध व्हा!

वर्षा देशपांडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटल्या. आता निवडणुकीच्या गडबडीतून ते मोकळे झाले असतील तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही. या दोन नेत्यांनी अमाप मेहनत घेतली. जनतेने यशही तसेच दिले. आता रयतेचे देणे फेडण्याची वेळ आहे. सुरुवात वर्षा देशपांडेंच्या दलित विकास महिला मंडळापासून करा. मायभगिनींच्या झुणका-भाकर केंद्राला लावलेले सील हे तुमच्या कारभाराला लागलेला डाग समजा. जर असतील तर त्रुटी दूर करायला लावून मायभगिनींचा रोजगाराचा हक्क परत द्या! अवघा महाराष्ट्र दुवा देईल!!

– तुळशीदास भोईटे
9833794961
(लेखक दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत.)