मायणीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा

0

मुंबई : सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील मायणी येथील आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ९५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इंडियन मेडिकल कौन्सिलला विनंती करण्याचा निर्णय विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

साताऱ्यातल्या आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या ९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अनियमित ठरवणे, पण, तरीही विद्यार्थ्यांना अंधारात ठेवणे, न्यायालयाच्या प्रक्रियेतही या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी आझाद मैदानावर चालवलेले उपोषण, या विषयाकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी या बैठकीचे निर्देश दिले होते. त्याआधी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीची तयारी दाखवली होती. विक्रम काळे, हुस्नबानो खलिफे, जयंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

आज झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपसभापती माणिकराव ठाकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान परिषदेतील आमदार जयंत पाटील, सतीश चव्हाण, निरंजन डावखरे, वैद्यकीय शिक्षण सचिव राजगोपाल देवरा, विधि व न्याय खात्याचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना मुंडे यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी संपूर्ण विधान परिषद सभागृह असून त्यांनी गेल्या ५२ दिवसांपासून सुरू ठेवलेले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले.