मातंग समाजाच्या विकासाला निधी कमी पडणार नाही

0
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
पिंपरी-चिंचवड : आजपर्यंत मातंग समाज हा इतरांच्या सुख-दुखात सहभागी होत आला आहे. पण यापुढे इतर समाजाने देखील त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाले पाहिजे. राज्य सरकार मातंग समाजाचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबद्ध असून मातंग समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात बैठक
राज्यातील मातंग समाजाच्या विविध प्रश्‍नासबंधी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहात अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी ते  बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष व सचिव मधुकर कांबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे सदस्य अमित गोरखे, प्रा. डॉ. राम कांबळे, अ‍ॅड.सुरेंद्र घोडजकर, प्रा.पंडित सुर्यवंशी, प्रा. डॉ. चागंदेव कांबळे, प्रा. सुभाष वायदंडे, प्रा. सागर रधंवे, स्वप्निल भिंगारदिवे, संदिप ठोबंरे, नितीन दिनकर, प्रा.डॉ.शिवाजी जवळगेकर, पुजा देडे, वैशाली थोरात उपस्थित होते.
कृतीशील उपाययोजनांवर चर्चा
बैठकीत क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करून नव्या स्वरूपात सुरु करणे याविषयी उपाययोजना आणि त्यांचे मुंबई येथे आंतर राष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण करणे, अनुसूचित जातीच्या बंद पडलेल्या, कालबाह्य झालेल्या विविध योजना नव्या स्वरूपात पुनर्रचना करणे, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेचे नाव बदलणे, अनुसूचित जातींसाठी असलेल्या विविध योजना, सवलती व इतर विकासाच्या योजनांचा लाभ अनुसूचित जातीमधील सर्वच जाती पोट-जातींना योग्य प्रमाणात मिळावा यासाठी कृतीशील उपाय योजना करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.