माझ्या क्षमतांना मी योग्य प्रकारे न्याय दिला – कोहली

0

नवी दिल्ली : जो खेळाडू आपल्यातील कमतरता ओळखून त्यावर अचूकपणे मात करतो आणि कामगिरीत सातत्य राखतो तोच सर्वोत्तम क्रिकेटपटू बनू शकतो, असे टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. माझ्या क्षमतांना मी योग्य प्रकारे न्याय दिला आणि त्याचा फायदा झाल्याचेही विराटने एका ब्रिटिश वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. गेले वर्ष विराटसाठी सर्वोत्तम ठरले असून त्याने सर्वच प्रकारात 2500 धावा ठोकल्या.

रोनाल्डोचा आपल्यावर प्रभाव
तुमच्यातील बलस्थाने आणि कमकुवत बाजू याचा योग्य ताळमेळ साधणे आवश्यक असते. प्रत्येक खेळाडूंमध्ये कमतरता असतातच. मात्र त्यातून बाहेर पडून फक्त कामगिरीत सातत्य राखण्यावर भर दिल्यास कसोटीतही चांगल्या धावा जमवता येतात, असेही त्याने म्हटले आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा आपल्यावर प्रभाव असल्याचेही विराटने सांगितले. आपल्या कामाच्या बाबतीत काही कठोर नियम पाळताना रोनाल्डो खूप मेहनतही करतो आणि मी त्याच्यापासून प्रेरणा घेत आहे, असेही त्याने म्हटले आहे.

दबाव न घेता खेळावे
खेळताना येणारे दडपण कोणीही टाळू शकत नाही, असेही विराटला वाटते. फलंदाजीसाठी आल्यानंतर चार क्षेत्ररक्षक स्लीपमध्ये उभे असतात; पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त सीमारेषेवर नजर ठेवली तर दडपण आपोआपच दूर होते. दडपणापासून दूर राहण्यापेक्षा मी एन्जॉय करतो. त्यामुळे चांगले यश मिळते, असेही त्याने स्पष्ट केले. मुक्तपणे खेळल्यास खेळाचा अधिक विकास होतो असे कोहलीचे मत आहे.