माझ्यासाठी विषय संपला – राज ठाकरे

0

मुंबई । मुंबई मराठी माणसाची आहे. मराठी माणूस मुंबईचा राजा आहे. त्याला वाचवण्यासाठी मी हात पुढे केला होता. आता माझ्यासाठी हा विषय संपल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पालिका निवडणुका लढवण्याचा बिगुल वाजवला. मुंबईतील मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

राज ठाकरे पक्षासाठी नाही, स्वत:साठी नाही, पण मराठी माणसासाठी कोणाचेही पाय चाटेल आणि वेळ पडल्यास मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा पायही छाटेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज्याचे तुकडे करण्याचे भाजपच्या डोक्यात पहिल्यापासून आहे. पहिला विदर्भ नंतर मुंबई हा भाजपचा डाव आहे. मला भाजप नको म्हणून मी हात पुढे केला. परंतु मी आता कोणाचेही कपडे काढायला, वाभाडे काढायला आणि निवडणूक लढायला समर्थ असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली निवडणुकीत जे घडले, तोच प्रकार आता सुरू झाला आहे. भांडले आणि नंतर एकत्र आले. शिवसेनेचा महापौर बंगल्यावर डोळा आहे. आतून सर्व मिळालेले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

संयुक्त महाराष्ट्र लढ्यामुळे मुंबई गुजरातला मिळाली नाही, हे गुजराती माणूस अजून विसरलेला नाही. मोदी व शहाच्या डोक्यात अजून हाच विषय असल्याने हे सर्व सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.