माझ्यामुळेच विराटसह अनेक खेळाडूंचे घडले करियर!

0

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आजवर मिळवलेले यश मी दिलेल्या शिकवणीमुळे आहे असा दावा ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमित राम रहिम सिंगने केला आहे. एका पत्रकार परिषदेत राम रहिम याने ही माहिती दिली. कोहली आपल्या आश्रमात आला होता आणि चांगली कामगिरी कशी करायची यासाठीचा सल्ला मी त्याला दिला होता. आक्रमक क्रिकेट कसे खेळावे याचा गुरूमंत्री आपण कोहलीला दिल्याचा दावा राम रहिमने यावेळी केला. इतकेच नाही, तर कोहली आपल्याकडून गुरूमंत्र घेत असल्याचा व्हिडिओ देखील लवकरच जाहीर करू, असेही तो म्हणाला.

धवन, नेहरा, झहीर, युसूफलाही शिकवण

कोहलीसोबतच शिखर धवन, आशिष नेहरा, झहीर खान, युसूफ पठाण यांनीही माझ्याकडून शिकवण घेतली, असे राम रहिमचे म्हणणे आहे. कोहली मात्र कधीच तुमचा उल्लेख देखील करत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला असता राम रहिमने त्यावरही सारवासारव करून आपलेच तुणतुणे वाजवले. कोहलीने माझे नाव कधी घेतले नाही, तरी मी त्याचा एक व्हिडिओ नक्कीच समोर आणणार आहोत. कोहली काही वर्षांपूर्वी आपल्याकडे आला होता. युसूफ पठाण, झहीर खान, आशिष नेहरा यांनीही आपल्याकडून वेळोवेळी सल्ले घेतले. आज या खेळाडूंनी माझा उल्लेख केला नसला तरी माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या बदलाची कल्पना त्यांना आहे. त्यांनी माझा उल्लेख केला नाही, तरी माझी काहीच हरकत नाही. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, असे राम रहिम म्हणाला.