माझा विश्वासघात झाला; भाजप आमदार

0

पणजी : गोवा राज्याच्या मंत्रिमंडळातून दोन आजारी मंत्र्यांना डच्चू देण्यात आले आहे. भाजपा आमदार फ्रान्सिस डिसोझा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने ते अमेरिकेत उपचार घेत आहे. दरम्यान त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजून मी कोणताच निर्णय घेतलेला नाही. माझा विश्वासघात झाला आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलेन व पुढे काय करायचे ते ठरवेन, असे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले.

ऑक्टोबरमध्ये मी गोव्यात परतल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलेन. कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. मला मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याच्या निर्णयानंतर शेकडो कार्यकर्त्यांचे फोन मला आले. दोन-तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पर्रीकर हे एकदा माझ्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी मला मंत्रिमंडळातून वगळले जाईल अशा बातम्या येण्यास आरंभ झाला होता. त्यामुळे मी मला खरोखर वगळले जाणार आहे काय असे पर्रीकर यांना विचारले होते. वगळले जाणार असेल तर मला अगोदरच सांगा, माझी हरकत नसेल असे मी मुख्यमंत्र्यांना म्हटले होते. त्यावेळी तुम्ही अतिशय ज्येष्ठ मंत्री असून आम्ही तुम्हाला मंत्रिमंडळातून का म्हणून डच्चू देणार असा उलट प्रश्न मला पर्रीकर यांनी विचारला होता. तुमच्यावर कसलाच आरोप नाही असेही पर्रीकर त्यावेळी म्हणाले होते. डिसोझा म्हणाले की, मला मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय हा गोवा प्रदेश भाजपाच्या कोअर टीमचा आहे. कोअर टीमचे कोणते सदस्य निरीक्षकांकडे काय बोलले हे मला ठाऊक आहे.

Copy