माजी सरन्यायाधीश गोगोईंनी घेतली खासदारकीची शपथ; विरोधकांकडून सभात्याग

0

नवी दिल्ली: देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपतींनी राज्यसभा सदस्यपदासाठी निर्देशित केले आहे. आज गुरुवारी त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. राष्ट्रपतींनी नामनिर्देशित कोट्यातून रंजन गोगोई राज्यसभेचे सदस्य झाले आहेत, मात्र यावरून त्यांच्यावर खूप टीका होत आहे. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला.

विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा फायदा देशाला व्हावा यासाठी राज्यसभा एक उत्तम मार्ग आहे. राज्यसभेची ती परंपरा चांगली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांचा फायदा या संसदेला होणार आहे, याला विरोध करण्याचे काही कारण नाही. विरोधकांनी राज्यसभेची परंपरा पाळली पाहिजे असे मत रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले.

रंजन गोगोई सरन्यायाधीश असताना अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले होते. राम मंदिराचा निकालही गोगोई यांच्याच कार्यकाळात दिला गेला. रंजन गोगोई यांना राज्यसभेसाठी निर्देशित केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे.

Copy