माजी मंत्री खडसेंना न झालेले सरकार जनतेला काय होणार

0

फैजपूर येथे विरोधी पक्षनेते विखे पाटील : सरकारमधून बाहेर पडा मगच बांधा मंदिर ; शिवसेनेलाही लगावला टोला

फैजपूर- विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस सरकारने भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही. येत्या अधिवेशनात भाजप नेत्यांची भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही. भाजप सरकार एकनाथराव खडसेंना झाले नाही तर जनतेला कुठून होणार आहे. ज्या माणसाने 40 वर्ष पक्षासाठी मेहनत घेतली त्या माणसावर अन्याय केला असल्याचे खुद्द खडसे सांगतात. गाडगे महाराज यांनी स्वतःहा हातात झाडू घेऊन परीसर स्वच्छ केला तसे येत्या निवडणुकीत तोच झाडू हातात घेवून जनतेने पाच वर्षीची घाण साफ करून पुन्हा काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन केले. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे म्हणतात, अयोध्येत राम मंदिर बांधणार मात्र आधी सरकार मधून तर बाहेर पडा मग राम मंदिर बांधा, अशी कोपरखळी त्यांनी मारली. 235 वेळा सरकार मधून बाहेर पडण्याच्या घोषणा शिवसेना करत आली पण काय तुझं माझ जमेना आणि तुझ्या वाचून माझ जमेना हीपरिस्थिती शिवसेनेची असल्याची टिकाही त्यांनी केली.

वाढत्या महागाईने जनता हैराण -सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, पेट्रोल-डिझेल व गॅसच्या वाढत्या किंमतीने जनता त्रासली आहे परंतु यावर मोदी सरकार मूग गिळून आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. जनसंघर्ष यात्रेची सुरुवात या पवित्र भूमीतून होत असल्याने नक्कीच येणार्‍या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

अच्छे दिन आले मात्र भाजपा नेत्यांचे -शिरीष चौधरी
माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, या भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटना जिवंत ठेवली आहे. रावेर-यावल तालुक्यात काँग्रेस सरकारच्या काळात रस्ते, वीज, पाणी या सर्व गोष्टी नागरीकांना मिळत असत परंतु अच्छे दिन आले पण ते भाजप नेत्यांचे आले आहे. सामान्य जनता महागाईने होरपळत आहे. सामान्य नागरीकांचा या भाजप सरकारने कणा मोडून टाकला आहे. येत्या निवडणुकीत हीच जनता या भाजप सरकारचा कणा मोडल्या शिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणता 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू मात्र कसे उत्पन्न दुप्पट होणार जे भाव आहे ते आधी द्या, असे सांगत चौधरी म्हणाले की, आमच्या भागाचे आमदार हरीभाऊ जावळे म्हणता मला क्षमा करा, मी रस्ते करू शकलो नाही. हे अत्यंत लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. आमदार भाजपचा, सरकार भाजपचे मात्र तरीही रस्ते होत नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल, असेही ते म्हणाले.

Copy