माजी मंत्री खडसेंना धक्का : मुक्ताईनगरातील भाजपाचे पाच नगरसेवक शिवसेनेत

सेनेची वाढली ताकद : आज चौघा नगरसेवकांच्या प्रवेशाची चर्चा

भुसावळ : भाजपाला रामराम करीत पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बुधवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केल्याने मुक्ताईनगरातील राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपाला हा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे पाचही नगरसेवक सत्ताधारी गटातून बाहेर पडले आहेत. बुधवारी सायंकाळी भाजपाच्या पाच व एका अपक्ष नगरसेवकांच्या हातावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

राजकीय भूकंपामुळे उडाली खळबळ
मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून नगराध्यक्षपदी नजमा तडवी विराजमान आहेत मात्र सत्ताधारी गटातील नगरसेवक आता शिवसेनेत गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या विद्यमान पाच व एक अपक्ष नगरसेवकांच्या हातावर बुधवारी सायंकाळी शिवबंधन बांधले. प्रसंगी भाजपा नगरसेवक पियुष मोरे, मुकेश वानखेडे, संतोष कोळी, बिल्कीसबी अमाणुल्ला खान, शबानाबी अब्दुल आरीफ व अपक्ष नगरसेविका नुसरतबी मेहबूब खान यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, गुरुवार, 27 मे रोजी आणखी चर्चा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपा नगरसेवक सेनेत गेल्यानंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये आगामी काळात राजकीय समीकरणेदेखील बदलण्याची शक्यता आहे.

धक्का नाही : प्रलोभन देवून पक्ष प्रवेश : माजी मंत्री खडसे
माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, हा धक्का वगैरे काहीच नाही. चार मुलांमुळे एक नगरसेविका आधीच अपात्र असून तिघांनी प्रवेश केला व त्यांच्यावरही अपात्र होण्याची टांगती तलवार आहे. अतिक्रमण, बनावट जातीचे दाखले दिल्या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांकडे 1 रोजी सुनावणी आहे. जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र केले तरी आम्ही मंत्र्यांकडून ‘स्टे’ आणून आम्ही तुमचे नगरसेवक पद टिकवू, हे प्रलोभन दिल्याने संबंधितानी प्रवेश केला आहे. आठ नगरसेवक भाजपात असलेतरी ते नाथाभाऊ समर्थकच आहे, असेही खडसे म्हणाले.