उत्तर प्रदेश सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचे निधन

0

लखनौ: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते उत्तरप्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे आज रविवारी १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागणीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांना आज रिवारी हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्यांचे निधन झाले.

चेतन चौहान यांच्याकडे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद होते. सैनिक कल्याण या खात्याचे ते मंत्री होते. दोनवेळा माजी खासदार म्हणून त्यांनी काम पहिले होते.

चौहान यांना जुलैमध्ये करोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले. मात्र यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७० च्या काळात चेतन चौहान आणि सुनिल गावसकर यांची जोडी विशेष गाजली होती. १९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले. गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच या जोडीच्या नावावर ३ हजार धावाही जमा आहेत. याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्येही चेतन चौहान यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आहे. १९८१ साली चौहान यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

Copy