Private Advt

मांजाने गळा कापला गेल्यानंतर दोन महिने अंथरुणावर, जेवणही हाेते बंद

 

जळगाव – नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्यानंतर गळ्याच्या आतून सात व बाहेरून आठ टाके पडले. शस्त्रक्रिया झाली. सुदैवाने या घटनेतून प्राण वाचले. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर दोन महिने अंथरुणावर पडून राहावे लागले. बोलणेही बंद होते. जेवण करता येत नव्हते. हे दोन महिने आयुष्यातील सर्वात कठीण काळ म्हणून लक्षात राहतील,

मेहरूण परिसरात ५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. फवाद यांचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला होता. ते स्वत: डॉक्टर असल्यामुळे दोन्ही हातांनी गळा दाबून धरला. रक्तस्राव रोखला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गळ्याच्या आतून श्वसननलिका, अन्ननलिका कापली गेली असल्याने तेथे सात टाके पडले. वरच्या बाजूने आठ टाके लावावे लागले. डिस्चार्ज झाल्यानंतर डॉ. फवाद हे अचलपूर (जि. अमरावती) येथे मूळ गावी निघून गेले. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर पुढील दोन महिने त्यांना बेडरेस्ट घ्यायचा होता. विशेष म्हणजे या काळात त्यांचे बोलणे पूर्णपणे बंद ठेवावे लागले. केवळ हाताच्या इशाऱ्याने ते कुटंुबीयांशी संवाद साधत होते. रक्तस्राव झालेला असल्यामुळे त्यांची हिमोग्लोबीन लेव्हल १२ वरून ८ वर आली. केवळ सूप, ज्यूस यासारखे पातळ अन्न घ्यावे लागले. त्यामुळे वजन सात ते आठ किलोने कमी झाले. अशक्तपणा आला होता. हा कठीण प्रसंग सांगत असताना डॉ. फवाद यांच्या अंगावर काटा आला. दरम्यान, दरवर्षी संक्रातीला पंतगाेत्सवात नायलाॅन मांजाचा वापर माेठ्या प्रमाणात हाेत असून नागरिकांनी हे हा स्वत: राेखले पाहिजे.
नायलाॅन मांजा धाेकेदायक; छुप्या पद्धतीने हाेणारी विक्री थांबवा
शासनाने नायलॉन मांजावर बंदी आणलेली आहे. तरीदेखील छुप्या पद्धतीने मांजा विक्री सुरूच आहे. माझ्यावर घडलेल्या प्रसंगानंतर धुळे व अमरावती जिल्ह्यात दोन जणांना अशाच घटनेत जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील विक्रेते हा मांजा विक्री करीत आहेत. हे फार धोकायदायक असल्याचे डॉ. फवाद यांनी सांगितले.