महिलेच्या खूनप्रकरणी नातेवाईकास अटक

0

नवापूर । उंबर्डी गावातील एका 55 वर्षीय महिलेच्या खूनप्रकरणाचा केवळ तीनच दिवसात उलगडा करण्यात नवापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, हा व्यक्ती मृत महिलेच्या नात्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

उंबर्डी गावातील पेडाफळीमधील रहिवासी संगीता रमेश गावित (वय 55 वर्षे) यांना 13 एप्रिल 2020 रोजी, सकाळी 11 वाजेपूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड मारुन जिवे ठार मारले होते. याप्रकरणी संगीताबाई यांचा मुलगा जीवन याने दिलेल्या तक्रारीवरुन नवापूर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी तपास हाती घेताच तपासाची चक्रे फिरवली. यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार उंबर्डी गावातील जयंत्या नहाड्या गावित यास ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता, तो मयत महिलेच्या मामाचा मुलगा असून, अंत्यविधीला आणि दवाखान्यातसुद्धा हजर होता. त्याच्या हालचाली पोलिसांनी टिपलेल्या होत्या. त्याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली.

संगीताबाई हिचे गावातील वागणे व फिरणे यावरुन जयंत्याच्या घरात भांडण व्हायचे. त्यामुळे जयंत्या याने संगीताबाई चारा घेवून घरी जात असतांना तिच्या डोक्यात दगड मारुन तिला जिवे ठार मारले. तिचे प्रेत हे कोणास सापडू नये म्हणून तिला डोंगरात घेवुन जावून डोंगराच्या नालीत ठेवून त्याच्यावर दगड व पालापाचोळा टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या सोबत पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पो.नि. दिगंबर शिंपी, असई कृष्णा पवार, पोहेकॉ गुमानसिंग पाडवी, सुनिल जाधव, पोना प्रवीण मोरे, महेश पवार, नरेंद्र नाईक, अल्ताफ शेख, पोकॉ आदिनाथ गोसावी, जयेश बावीस्कर, आदिनाथ गोसावी व हरसिंग पावरा यांनी गुन्ह्याचा तपास केला.

Copy